शिरूर लोकसभेसाठी आज मतसंग्राम; पोलिस बंदोबस्तात साहित्याचे वितरण

शिरूर लोकसभेसाठी आज मतसंग्राम; पोलिस बंदोबस्तात साहित्याचे वितरण

उरुळी कांचन : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) होणार्‍या मतदानासाठी रविवारी (दि. 12) पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रांवरपोहोचेल याची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघात 25 लाख 39 हजार 702 मतदार असून, ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 46 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 18 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 68 बॅलेट युनिट, 356 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रांवर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 54 एसटी बस आणि 27 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ :
या विधानसभा मतदारसंघाकरिता शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 170 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 34 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 20 बॅलेट युनिट, 340 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 72 एसटी बस आणि 52 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ :
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी, राजगुरुनगर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 92 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 20 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 155 बॅलेट युनिट, 385 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 64 एसटी बस आणि 8 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
शिरूर विधानसभा मतदारसंघ :
राज्य वखार महामंडळ गोदाम रांजणगाव येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 40 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 80 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 317 बॅलेट युनिट, 439 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 71 एसटी बस आणि 7 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
भोसरी विधानसभा मतदारसंघ :
या मतदारसंघासाठी घरकुल ईडब्ल्यूएस टाऊन हॉल, चिखली येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 150 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 50 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 404 बॅलेट युनिट, 468 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 115 एसटी बस आणि खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
हडपसर विधानसभा मतदारसंघ :
या मतदारसंघाकरिता साधना शैक्षणिक संकुल माळवाडी येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. 180 अधिकारी व कर्मचार्‍यांनी 51 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. 1 हजार 563 बॅलेट युनिट, 521 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता 106 एसटी बस आणि 22 खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आले असून बसगाड्या, खासगी वाहनांद्वारे रविवारी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलिस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदींच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी, दि. 13 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.
अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी

1 हजार 268 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 268 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सुरू असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. यामध्ये जुन्नर 179, आंबेगाव 180, खेड आळंदी 193, शिरूर 220, भोसरी 235 आणि हडपसर 261 मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या नियंत्रण कक्षातून या यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची आकडेवारी
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 25 लाख 39 हजार 702 मतदार आहेत. यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 12 हजार 205, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 2 हजार 101 मतदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 52 हजार 634 मतदार, शिरूर विधानसभा मतदारसंघात 4 लाख 39 हजार 276 मतदार, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 51 हजार 582 मतदार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 81 हजार 904 मतदार आहेत.
2 हजार 509 मतदान केंद्रांवर होणार मतदान
शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 509 मतदान केंद्रे असून, यामध्ये 1 हजार 189 मतदान केंद्रे शहरी भागात, तर 1 हजार 320 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. 480 ठिकाणी एकल मतदान केंद्रे, 222 ठिकाणी दोन मतदान केंद्रे, 87 ठिकाणी तीन मतदान केंद्रे, 59 ठिकाणी चार मतदान केंद्रे, 36 ठिकाणी पाच मतदान केंद्रे, 27 ठिकाणी सहा मतदान केंद्रे तर 70 ठिकाणी सहापेक्षा अधिक मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 356 मतदान केंद्रे, आंबेगाव 338 मतदान केंद्रे आणि 2 साहाय्यकारी मतदान केंद्रे. खेड आळंदी 385 मतदान केंद्रे, शिरूर 405 मतदान केंद्रे आणि 34 साहाय्यकारी मतदान केंद्रे, भोसरी 464 मतदान केंद्रे आणि 4 साहाय्यकारी मतदान केंद्रे, तर हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 494 मतदान केंद्रे आणि 27 साहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.
हेही वाचा

गोमांस कंपनीकडून मोदींना ५५० कोटी : संजय राऊत यांचा आरोप
राष्ट्रवादी-भाजपात श्रेयवाद; इंदापुरातील गावागावांत लागल्या पैजा
सिनेस्टाईल थरारनाट्य : पोहत पाठलाग करून दारू विक्रेत्याला पकडले