लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९६ जागांसाठी मतदान सुरू

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९६ जागांसाठी मतदान सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यात आज सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू झाले आहे. देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रक्षा खडसे आदींची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Voting begins for 96 seats in fourth phase of Lok Sabha polls
Read @ANI Story | https://t.co/2dHajyPK3S#LokSabaElections2024 #Phase4 pic.twitter.com/yPZt6N7jC5
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2024

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९ राज्ये, १ केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांवर मतदान सुरू आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 969 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिले आहेत.
मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.
या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांची आणि राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Elections 2024) राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. बीड मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत आहे. या मतदारसंघात मराठा आणि वंजारी मतांचे झालेले ध्रुवीकरण पाहता कोणाचा विजय होतो याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. अहमदनगर मतदारसंघात विखे- पाटील यांच्या वर्चस्वापुढे यावेळी आमदार निलेश लंके यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांच्या विजयासाठी विखे-पाटील आणि भाजप महायुतीची मोठी यंत्रणा राबत आहे. लंके यांनी सर्वसामान्य मतदारांमध्ये जाऊन परिवर्तनासाठी मते मागितली आहेत. या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडेही राज्याचे लक्ष आहे. शिर्डीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यापुढे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यापुढे काँग्रेसच्या कल्याण काळे यांचे आव्हान उभे आहे. रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला आहे. आता त्यांनी सहाव्यांदा लोकसभेत जाण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
पुण्यात तुल्यबळ लढत
पुण्यात यावेळी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत आहे. ही लढत भाजपला सोपी वाटत असली तरी धंगेकर यांनी त्यांना चांगली लढत दिली आहे. शिरूर मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच नंदूरबार मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित आणि काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यातही अटीतटीची लढत आहे. या लढतीत मतदार कोणाला कौल देतात हे ठरणार आहे. मावळ मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघिरे यांच्यात सरळ लढत आहे.
संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंत्री संदिपान भुमरे यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. संभाजीनगरमधील हिंदुत्ववादी मते कोणत्या शिवसेनेला पसंती देतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेच्या मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा जलील यांनाही होऊ शकतो.
खडसेंची प्रतिष्ठा पणाला
रावेरमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या रूपाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात असलेले खडसे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपल्या सुनेला निवडून आणण्यासाठी आपली सर्व ताकद झोकून दिली आहे. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे शिवसेनेचे करण पवार यांच्यात चुरशीचा सामना रंगला आहे.
हेही वाचा : 

हिजाब परिधान केलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होईल
फोडाफोडीचे राजकारण शरद पवारांनी सुरू केले : राज ठाकरे
…तर मला तुरुंगात जावे लागणार नाही : अरविंद केजरीवाल