क्राईम डायरी- शरीरसुखास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा आवळला

क्राईम डायरी- शरीरसुखास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा आवळला

दीपक जाधव, पणजी

दिवसभराच्या कामाने थकलेली ती दुसर्‍या दिवशी कामाला जाण्यासाठी शांत झोपली होती. मध्यरात्री अचानक तिच्या नवर्‍यात मद संचारला. मात्र दिवसभराच्या कामाने थकलेले शरीर आणि डोळ्यावर असणार्‍या झोपेमुळे तिने शरीरसुखास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या त्याने मुलांसमोर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. या नराधम पतीला न्यायालयानेही सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मूळ ओडिशा येथील रहिवासी असलेला अशोक कुमार हा झुआरीनगर येथे पत्नी बिंदू व दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत राहात होता. हे दोघे तिथेच मिळेल त्या इमारतीवर मजूर म्हणून काम करत होते. 25 मार्च 2019 रोजी रात्री अशोक हा नेहमीप्रमाणे यथेच्छ मद्यप्राशन करून आला. हे सर्व रात्री एकत्र झोपी गेले. दिवसभरातील कामाने थकल्यामुळे बिंदू काही वेळातच झोपी गेली. मध्यरात्री दीडच्या सुमारास अशोक कुमार याने तिला झोपेतून उठवून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यामुळे अशोक कुमार संतप्त झाला. त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरीही ती साथ देत नसल्याने अशोक कुमार याने तिला जमिनीवर खाली पाडून तिचा गळा आवळला. यावेळी झालेल्या झटापटीमुळे बाजूला झोपलेली दोन्ही मुले उठून बसली. आईला बाबा मारत असल्याचे पाहून पाच वर्षांच्या मुलीने रडायला सुरुवात केली. मात्र कामवासना आणि संतापाने पिसाटलेल्या अशोक कुमारने बिंदू हिच्या गळ्यावरचा हात काढला नाही. त्यामुळे बिंदू हिचा गुदमरून मृत्यू झाला.
बिंदू निपचित पडल्यानंतर अशोक कुमार बाजूला झाला. डोक्यातली नशाही उतरली. काही वेळ तो शांत बसून राहिला. त्यानंतर तो थेट सांकवाळ पोलिस दूरक्षेत्रात गेला. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर हे पोलिस पथकासह त्याला घेऊन त्याच्या खोलीवर गेले. तिथे बिंदू हिचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवून देत अशोक कुमार याला भा. दं. वि. सं. कलम 302 अन्वये अटक केली. दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत नातेवाईकांकडे सुपूर्द केले.
हेही वाचा : 

कर्जबाजारी भूषणला नको ती अवदसा आठवली अन्…
कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
आधी आईवर अतिप्रसंग, नंतर मुलीचा लैंगिक अत्याचार करुन गळा आवळला