उत्तम झोपेमुळे वय, कार्यक्षमता व प्रसन्नतेत वृद्धी; संशोधनातून निष्कर्ष

उत्तम झोपेमुळे वय, कार्यक्षमता व प्रसन्नतेत वृद्धी; संशोधनातून निष्कर्ष

न्यूयॉर्क : उत्तम झोप घेतली, तर त्याचा आपले वय, आपली निर्मितीक्षमता व आपली प्रसन्नता यात अनेक लाभ होतात, असे निरीक्षण निद्रानाशाचा विकार जडलेल्या रुग्णांवर संशोधन करणार्‍या अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. झोप उत्तम असेल, तरच स्मरणशक्ती चांगली राहते; शिवाय एकाग्रताही वाढते. मात्र, याउलट निद्रानाशाचे अनेक तोटे संभवतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रोज शक्य तितकी झोप घेणे आवश्यक ठरते, असे या संशोधकांचे मत आहे.
तसे पाहता, मनुष्याच्या आयुष्यातील एक-तृतीयांश भाग झोपेत व्यतीत होतो. एका ज्येष्ठ व्यक्तीसाठीही 8 तासांची झोप पुरेशी असते. पण, कमी झोप घेणार्‍या व्यक्तींवर संशोधन केले असता त्यात अनेक तोटे जाणवतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकेसह जवळपास जगभरात सर्वत्र पुरेशी झोप नसणे हे सामान्य असून, याला एक विकारच मानले गेले आहे. अमेरिकन संशोधकांनी यासाठी स्लीप लॅबमधून अनेक प्रयोग राबवले व त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
काही जण अनेक आठवडे, अनेक महिन्यांपासून, तर काही जण त्याहीपेक्षा प्रदीर्घ कालावधीपासून अजिबात पुरेशी झोप घेतलेली नाही, असे लोक उत्तम झोपेचा सराव व्हावा, यासाठी स्लीप लॅबमध्ये प्रवेश घेत असतात आणि अशा स्लीप लॅबमध्ये दिवसाकाठी किमान 14 तास बिछान्यात पडून राहण्यास सांगितले जाते. या अभ्यासात असे दिसून आले की, अशी संधी ज्यांना मिळते, ते किमान 12 तास छान झोप काढतात. यामुळे त्यांची एका वेळची झोप 7 ते 9 तासांपर्यंत असू शकते, असेही या संशोधनात नमूद आहे.
मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अशा लोकांच्या झोपेच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. जे लोक रात्रीच्या वेळी 8 तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांच्यात शारीरिक कमतरता आढळून आली. शिवाय, विस्मरण, निर्णय घेण्याची क्षमता नसणे, एकाग्रता साधण्यात अपयश, याचबरोबर चिडचिडेपणा अशी लक्षणे त्यांच्यात दिसून आली.
जपानमध्ये तर झोप पूर्ण व्हावी, यासाठी कार्यालयात काम करत असतानाही 20 मिनिटांची झोप घेण्याची सूचना असते. याला ते ‘इनेमुरी स्लीप’ या नावाने ओळखतात. अनेक कार्यालयांत स्लीपिंग पॉडसारखे पर्याय देखील लोकप्रिय आहेत. असे स्लीपिंग पॉड तेथे डेस्कला जोडूनच असतात.