नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने महायुतीतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Lok Sabha)
महाविकास आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाजे यांचा प्रचार महिनाभरापासून सुरू असताना महायुतीत मात्र अजूनही नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेऊन देखील राष्ट्रवादीने अद्याप नाशिकच्या जागेचा दावा सोडलेला नाही. त्यातच बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उभे करेल, असे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशकात बैठक घेत नाशिकची जागा राष्ट्रवादीच लढवणार, असा ठराव केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू असताना आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याने महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना नाशिकबाबत विचारणा केली असता, नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आहे. नाशिक ही पारंपारिक शिवसेनेची जागा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा –

जुन्या पेन्शनसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व : चंद्रशेखर बावनकुळे