‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर लेखक आणि वक्ते जगदीश ओहोळ यांनी, हे प्रेरणादायी पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक डॉ. सुरज एंगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील पत्रकारीता विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे प्रमुख विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे यांच्यासह कोलंबिया विद्यापीठातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थित होती.

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुस्तकातील आशय आणि त्यातून वाचकांना पटलेले प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर यामुळे लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला, नव्या भाषेत सर्वांसाठी प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच, या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करू –
-जगदीश ओहोळ, पुस्तकाचे लेखक
कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात ‘आंबेडकर इंटरनॅशनल मिशन’च्या माध्यमातून भीमजयंतीसह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते आणि लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक आणि सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे पुस्तक आहे.
– विकास ताताड, ‘आंबेडकर इंटरनॅशनल मिशन’ संचालक, अमेरिका