विदर्भातील ५ मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या; शुक्रवारी मतदान     

विदर्भातील ५ मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या; शुक्रवारी मतदान     

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघातील मतदान आटोपले. आता दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 एप्रिलरोजी पश्चिम विदर्भातील  अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ- वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा अशा पाच लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक होत आहे. आज (दि.२४)  सायंकाळी निवडणूक प्रचारतोफा शांत झाल्यानंतर उमेदवार, पोल मॅनेजर्स मतांची बेरीज, वजाबाकीच्या गणितात गुंतले आहेत.
पश्चिम विदर्भात अमरावती,वर्धा यवतमाळ मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळेगाव येथे तर शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि अकोला,अमरावतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पावसाचा फटका बसलेली सभा लक्षवेधी ठरली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरद पवार, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपचे नेते संजय सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. प्रचारतोफा थंड होण्याच्या दिवशी अमरावतीत आ राणा-आ बच्चू कडू यांच्यातील सभेच्या मैदानावरूनचा वाद, यानंतर कडू यांना मैदान न मिळाल्याने त्यांनी रॅलीच्या माध्यमातून केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.
यवतमाळ वाशिम मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीद्वारे ही लढत प्रतिष्ठेची असल्याचे दाखवून दिले. एकीकडे पूर्व विदर्भात कडक उन्हाचा तडाखा, मतदारांची अनास्था यातून नागपूर, रामटेकसह पाच लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान पाहायला मिळाले. आता पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस आणि कडक ऊन अशा वातावरणात होणाऱ्या निवडणुकीत किती टक्के मतदान होते आणि होणारे मतदान महाविकास आघाडी की महायुती कोणाचे पारडे जड ठरविणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
निवडणूक होऊ घातलेल्या पाच लोकसभा मतदारसंघांचा विचार करता अमरावतीत विद्यमान खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार असून विरोधात  काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर असा तर यवतमाळमध्ये महायुतीच्या राजश्री पाटील विरुद्ध मविआचे संजय देशमुख, वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस,महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे अशी लढत होत आहे.
तर दुसरीकडे बुलढाणा मतदारसंघात विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे विरोधात महाविकास आघाडीतर्फे नरेंद्र खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असा तर अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील अशी लढत रंगणार आहे.
हेही वाचा 

नागपूर: पीएम मोदींनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांकडून ‘मन की बात’
नागपूर : रविवारपासून विदर्भात, वर्धेत शरद पवार, उध्दव ठाकरेंच्या सभा
Sanjay Raut | 4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत यांची टीका