भीषण पाणीटंचाई ! वरोती येथे रेशनिंगप्रमाणे पाण्याचे वाटप

भीषण पाणीटंचाई ! वरोती येथे रेशनिंगप्रमाणे पाण्याचे वाटप

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या व अतिवृष्टी होणार्‍या तोरणागड परिसरातील दुर्गम वरोती, कुसारपेठ (ता. राजगड) व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरू आहे. वरोती येथे नदीतीरावरील विहिरीचे पाणी स्थानिक नागरिकांना रेशनिंग पध्दतीने वाटप केले जात आहे. या भागातील लाखो रुपये खर्चाच्या जलजीवनच्या पाणी योजना अर्धवट अवस्थेत खितपत पडल्या आहेत. बंधारे, पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हंडाभर पाण्यासाठी महिला, मुले नागरिकांची कडक उन्हात वणवण सुरू आहे.
वरोती येथील नदीवर जलसंधारण योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पाझर तलाव उभारला जात आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. यापूर्वी या भागात कोट्यवधी रुपये खर्च करून बंधारे, पाणी योजना राबविण्यात आल्या. मात्र, निकृष्ट कामामुळे त्या फसल्या आहेत. डोंगर माथ्यावरील कुसारपेठ धनगरवस्तीत देखील पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. येथील जलजीवन योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. योजनेचे पाइप टाकले असून, विहीर बांधली आहे. एक किलोमीटर अंतरावरील या विहिरीतील पाणी भर उन्हात डोक्यावरून आणून कुसारपेठचे रहिवासी आपली तहान भागवत आहेत.
वरोतीचा बंधारा जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत वरोती येथील एक बंधारा जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत, तर दुसरा कोरडा आहे. 500 लोकवस्तीच्या वरोतीसाठी प्रथम राष्ट्रीय पेयजल योजना आणि नंतर जलजीवन योजनेचे काम सुरू झाले. लाखो रुपये खर्च करून या योजनेसाठी नदीतीरावर नवीन विहीर बांधली. मात्र, अद्यापही योजना सुरू झालेली नाही. या योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी
खाली गेल्याने ग्रामस्थांना रेशनिंगप्रमाणे पाण्याचे वाटप केले जात आहे.
…तर पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’
जलजीवन योजनेचे काम पूर्ण करावे तसेच तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा वेल्हे पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा निर्धार आशा शिळीमकर, स्वाती शिळीमकर, शोभा जाधव, आशा पवार आदींनी केला आहे.
वरोती व कुसारपेठ येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. कुसारपेठ योजनेसाठी वन विभाग तसेच जागेचे बक्षीसपत्र अशा तांत्रिक अडचणी आहेत. याबाबत संबंधित ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली आहे, तर वरोती योजनेची गुरुवारी (दि. 4) पाहणी केली जाणार आहे.
चेतन ठाकूर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
पाणीटंचाईमुळे या भागातील माणसांसह जनावरांचे हाल सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही शासनाने दखल घेतली नाही.
– विलास शिळीमकर, माजी सरपंच, वरोती

हेही वाचा

Pune : दुष्काळातही तीन एकरांत 45 टन कांदा उत्पादन..
उजनी धरणाने गाठला तळ; दूषित पाण्याने तहान भागणार की..
जवळाबाजार बसस्थानक परिसरातील अरूंद रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप

Latest Marathi News भीषण पाणीटंचाई ! वरोती येथे रेशनिंगप्रमाणे पाण्याचे वाटप Brought to You By : Bharat Live News Media.