नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप

नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- अवैध पद्धतीने दरमहा पाच टक्के व्याजदराने कर्ज वाटप करून कर्जदारांकडील मालमत्ता हडप केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी लेखापरीक्षकांच्या फिर्यादीनुसार, म्हसरूळ पोलिस ठाण्यात मखमलाबाद येथील दोन खासगी सावकारांविरोधात फसवणुकीसह सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण काकड (३८, रा. मानकर मळा) व पोपट काकड (४१, रा. शांतिनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. लेखापरीक्षक रवींद्र गुंजाळ यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २००८ पासून दोंदे मळा व मानकर मळा परिसरात खासगी सावकारीचा व्यवसाय केला. रामदास मोगल यांनी निफाड सहायक सहकारी निबंधकांकडे केलेल्या तक्रारीनुसार चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. प्रशासनाने दोन्ही संशयितांची घरझडती घेतली असता, त्यांच्याकडे ४६ करारनामे, ४४ कोरे स्टॅंप पेपर, इतर नावांनी ५ स्टँप पेपर, १०७ धनादेश तसेच व्याज व कर्ज दिल्याच्या नोंदी असलेल्या ३ डायऱ्या मिळून आल्या. या कागदपत्रांची तपासणी केली असता, संशयितांनी १२५ ते १५० जणांना कर्ज देऊन दरमहा ५ टक्के व्याज वसूल केल्याचे उघड झाले. तसेच काही प्रकरणांमध्ये कर्जदारांकडील मालमत्ता या कवडीमोल दराने हडप करीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. दोघांकडेही सावकारी करण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराच्या झडतीत अनेक पुरावे
सहकारी निबंधकांनी केलेल्या घरझडतीत संशयितांनी खासगी सावकारी करत असल्याचे पुरावे मिळाले. त्यात कोरे मुद्रांक, धनादेश, कर्जदारांची यादी व त्यांना दिलेल्या कर्जाचा तपशील आदी बाबी होत्या. याबाबत दोघांनाही खुलासा करता आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे या दोघांनी कर्जदारांवर दबाव टाकून त्यांच्याकडील स्थावर-जंगम मालमत्ताही बळकावल्याचे तपासात उघड झाले.
दोन्ही संशयितांनी अनेकांना फसवल्याचे समोर येत आहे. खासगी सावकारीच्या माध्यमातून ही फसवणूक झाली असून त्याची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. -सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 | उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काय आहेत आवश्यक तरतुदी? घ्या जाणून..
Jalgaon News | जिल्ह्यातील साडेआठ लाख पशुधनाला जून अखेर पर्यंत पुरेल एवढा चारा
हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू

Latest Marathi News नाशिकमध्ये दोघांकडून बेकायदेशीर सावकारकी, अनेकांच्या मालमत्ता केल्या हडप Brought to You By : Bharat Live News Media.