नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला

नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला

नागपूर ; राजेंद्र उट्टलवार एकीकडे नागपुरात कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानासाठी प्रचार रंगात येऊ लागला आहे. आजपासून राज्यातील अनेक दिग्गज नेते विदर्भात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार काल (मंगळवार) रात्रीपासून नागपूर, पूर्व विदर्भात तळ ठोकून आहेत.
शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्याकडे त्यांनी आज स्नेहमिलनाला हजेरी लावली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार अशी अनेक मंडळी पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा निवडणूक क्षेत्रात प्रचाराच्या निमित्ताने नियोजनात व्यस्त आहेत.
आज वर्धा लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हजर होते. दरम्यान, नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस मविआचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सकाळी शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. दुपारच्या सत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत हजेरी लावत’ हम साथ साथ है’ असे म्हणत ‘कहो दिल से नितीनजी फिरसे’… असा नारा बुलंद केला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रचारात गुंतले आहेत. सोमवारी रात्री यवतमाळच्या खासदार भावना गवळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्या. दुसऱ्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 4 एप्रिल असल्याने उर्वरित जागांवर उमेदवारीचा गुंता आज- उद्या सोडवण्याच्या दृष्टीने भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री कोराडीत पार पडली. यावेळी सहा मतदारसंघात बूथ पातळीवर भक्कमपणाने काम करीत महायुतीच्या उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळत कसे विजयी करायचे या दृष्टीने मंथन करण्यात आले.
नाराजी असली तरी ती लवकर संपवा, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने कामाला लागा अशा सूचना आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. एकंदरीत वाढत्या तापमानासोबतच पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारामुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप मोठ्या जाहीर सभा सुरू व्हायच्या आहेत.
हेही वाचा : 

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, YS शर्मिला कडप्पामधून निवडणूक लढवणार

इंडिया आघाडीकडे फक्त भारत तोडण्याचे काम : राज्यमंत्री रामदास आठवले

राऊतांनी जॉनी लिव्हरची उपमा देताच प्रत्युत्तरात केश्टो, गणपत पाटलांची उपमा

Latest Marathi News नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला Brought to You By : Bharat Live News Media.