चीनने अरुणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, जयशंकर म्हणाले…LAC वर सैन्य तैनात

चीनने अरुणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, जयशंकर म्हणाले…LAC वर सैन्य तैनात

Bharat Live News Media ऑनलाईन : चीनची खुमखुमी थांबता थांबेना झाली आहे. आता चीनने भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांच्या ३० नवीन नावांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. याद्वारे चीनने अरुणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने अरुणाचलमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) विविध ठिकाणांची नावे बदलली आहेत. पण भारताने चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील’, असे सांगत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावले आहे. (China renames places in Arunachal)
चीनने भारतीय हद्दीतील ठिकाणांची नाव बदलण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक ठिकाणांवर चीनने दावा ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी नागरी व्यवहार मंत्रालयाने सोमवारी प्रशासकीय विभागांची स्थापना करत ठिकाणांची नावे बदलत अरुणाचल प्रदेशातील काही जागांवर दावा करण्याचा नवीन प्रयत्न केला.
चीनने अरुणाचल प्रदेशातील तथाकथित ‘प्रमाणित’ भौगोलिक नावांची यादी जारी केली. ज्याला बीजिंग झांगनान म्हणून ओळखते, असे चिनी सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. चीनने नामकरण केलेल्या ३० ठिकाणांमध्ये १२ पर्वत, ४ नद्या, १ तलाव, १ डोंगर खिंड, ११ रहिवासी क्षेत्रे आणि एक जमिनीचा तुकडा यांचा समावेश आहे. या नावांच्या यादीव्यतिरिक्त, चिनी मंत्रालयाने तपशीलवार अक्षांश आणि रेखांश आणि क्षेत्रांचा हाय रिझोल्यूशन नकाशादेखील शेअर केला आहे.
२०१७ मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांसाठी ‘प्रमाणित’ नावांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यांनी २०२१ मध्ये १५ ठिकाणांचा समावेश असलेली दुसरी यादी समोर आणली होती. २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ११ अतिरिक्त ठिकाणांची नावे असलेली आणखी एक यादी प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील भूभागावर दावा करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने अनेकवळा फेटाळून लावला आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनकडून अरुणाचलमधील ठिकाणांची नावे बदलली तरी वास्तव बदलत नाही आणि यामुळे काहीही परिणाम नाही, अशी ठाम भूमिका भारताने मांडली आहे. (China renames places in Arunachal)
तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का?- जयशंकर
चीनच्या नव्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले, “आज मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का?. अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य आहे, होते आणि नेहमीच राहील. ठिकाणांची नावे बदलण्याने कोणताही परिणाम होत नाही.” “आमचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहे…,” असे जयशंकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
काही दिवसांपूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य होता, आहे आणि कायम राहील.

#WATCH | Surat, Gujarat: On China’s claim regarding Arunachal Pradesh, EAM Dr S Jaishankar says, “If today I change the name of your house, will it become mine? Arunachal Pradesh was, is and will always be a state of India. Changing names does not have an effect…Our army is… pic.twitter.com/EaN66BfNFj
— ANI (@ANI) April 1, 2024

हे ही वाचा :

भारतात शिकलेल्यांपेक्षा निरक्षरांनाच रोजगाराच्या अधिक संधी
इस्रायलचा सिरियातील इराणच्या दुतावासावर बॉम्बहल्ला; ८ ठार
उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले

 
The post चीनने अरुणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, जयशंकर म्हणाले…LAC वर सैन्य तैनात appeared first on Bharat Live News Media.

Go to Source