सांगलीच्या वादावर आज पडदा? उद्धव ठाकरे-खर्गे यांच्यात चर्चा

सांगलीच्या वादावर आज पडदा? उद्धव ठाकरे-खर्गे यांच्यात चर्चा

सांगली;  Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात आज (दि. 2) चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील उमेदवार बुधवारी, तीन एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, 2 एप्रिलला खर्गे आणि ठाकरे यांच्या चर्चेत सांगलीतील पेच सुटेल, असा होरा आहे.
काँग्रेस व शिवसेना दोन्हीही पक्ष या सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे सांगलीवरून महाविकास आघाडीत पेच आहे. या जागेवरून नेत्यांमध्ये कलगीतुराही रंगलेला आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, मात्र तोडगा निघाला नाही. परिणामी मैत्रीपूर्ण लढत करूया, अशी भूमिका काँग्रेसच्या राज्यातील व केंद्रातील बहुतेक नेत्यांनी मांडली होती. त्याला ठाकरे गटाचा विरोध आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मैत्रीपूर्ण असे काही होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज आहेत. आता उमेदवार विशाल पाटील यांच्यासह आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री पाटील आदी काँग्रेसजन काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
दरम्यान, सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन अशा एकूण पाच जागांबाबत महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. या पाचही जागांबाबत आज, मंगळवारी तोडगा निघण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.
जयंत पाटील यांच्या नावामुळे खळबळ
सातारा लोकसभेची जागा काँग्रेसला देऊन बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटास देऊन सांगलीत जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत रविवारपासून चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खासदार संजय पाटील विरुद्ध जयंत पाटील अशी लढत झाली तर काय होईल, याबाबत चर्चा व तर्कवितर्क सुरू आहेत. त्याचे पडसाद समाजमाध्यमातही उमटत आहेत. मात्र जयंत पाटील सांगलीची जागा लढणार नाहीत, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.
Latest Marathi News सांगलीच्या वादावर आज पडदा? उद्धव ठाकरे-खर्गे यांच्यात चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.