सांगली राष्ट्रवादीला, तर सातारा काँग्रेसला

सांगली राष्ट्रवादीला, तर सातारा काँग्रेसला

कराड; Bharat Live News Media वृत्तसेवा : स्व. यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात जातीयवादी पक्षांचा शिरकाव होऊ द्यायचा नाही. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथे भेट घेऊन सुमारे तासभर कमरा बंद चर्चा केली. या चर्चेमध्ये सातारची जागा काँग्रेसला देण्याबरोबरच सांगलीची जागा राष्ट्रवादीला सोडायची, अशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीच्या सांगली येथील जागेवरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यातूनच मग मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची तयारी असली, तरी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे आज ठामपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण देऊन निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत असल्याचे सांगितले होते. असे असले तरी सातारा लोकसभेसह सांगली येथील जागेवरही सक्षम उमेदवार देण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार आहे. या दोन्हीही जागांची आदलाबदली करून सातारची जागा काँग्रेसला द्यायची व त्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडायची असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच मग सातारा येथून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवायची आणि सांगलीमधून स्वतः जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. तसा प्रस्ताव घेऊन आज जयंत पाटील यांनी कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांची निवासस्थानी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यानच बंद खोलीतून महाविकास आघाडीच्या या दोन दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, बंद खोलीतील चर्चेनंतर पत्रकारांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून सक्षम, स्ट्राँग व पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे. त्याबद्दल चाचणी सुरू असून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर ते आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करत आहे. बंद खोलीत होणारी चर्चा व्यासपीठावर करता येणार नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या या मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत लोकसभेला कोणत्याही जातीयवादी पक्षाचा उमेदवार यशस्वी झाला नाही. ही परंपरा आम्हाला कायम ठेवायचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन हा यशवंत विचारांचा परिसर आम्हाला कायम ठेवायचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आम्हाला कायम जपायचा आहे. त्या विचारांवर जातीयवादी पक्षांचे मोठे आक्रमण होत आहे. हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. सातारमधील उमेदवारीबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय राज्यातील महाविकास आघाडी मान्य करेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
Latest Marathi News सांगली राष्ट्रवादीला, तर सातारा काँग्रेसला Brought to You By : Bharat Live News Media.