जन्म-मृत्यूच्या दाखल्याचा घोळ; खासगी रुग्णालयांनी शहानिशा करावी : महापालिकेचे आवाहन

जन्म-मृत्यूच्या दाखल्याचा घोळ; खासगी रुग्णालयांनी शहानिशा करावी : महापालिकेचे आवाहन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील एका वयस्कर गृहस्थाच्या मृत्यूनंतर त्याच्या पेन्शनचे पैसे मिळण्यावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे. संबंधित व्यक्तीने पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केला. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर पेन्शनचे पैसे आपल्याला मिळावेत, यासाठी दोन्ही पत्नींनी अर्ज केला. मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक माहिती लिहिताना खासगी रुग्णालयाने दुसर्‍या पत्नीच्या नावाची नोंद केल्याने पेच निर्माण झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी जन्म आणि मृत्यूची नोंदणी करताना नावांची शहानिशा करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संबंधित प्रकार निदर्शनास आला आहे. सरकारी सेवेमध्ये नोकरी करणार्‍याचा मृत्यू झाला. त्याच्या पेन्शन बुकमध्ये पहिल्या कायदेशीर पत्नीचे नाव नोंदवण्यात आले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्याने दुसरा विवाह केला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि पेन्शनच्या पैशांचा घोळ सुरू झाला. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूसमयी दुसरी पत्नी उपस्थित होती. मृत्यूचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेली माहिती फीड करत असताना खासगी रुग्णालयाने दुसर्‍या पत्नीचे नाव संदर्भित केले. तिच्या मुलाच्या जन्म दाखल्यावरही सदर व्यक्तीचे नाव असल्याने तिने आपल्याला पेन्शन मिळावी, यासाठी अर्ज केला. संबंधित प्रकरण वारसा हक्क कायद्याअंतर्गत न्यायप्रविष्ट आहे.
जन्म किंवा मृत्यू दाखला तयार करताना खासगी रुग्णालयाने फीड केलेली माहिती संदर्भासाठी वापरली जाते. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना ऑनलाइन सिस्टिममध्ये भरल्या गेलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे खासगी रुग्णालयांनी ही माहिती भरताना कागदपत्रांची शहानिशा करावी.
– डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

अलेक्सेंडर पोपटाची तस्करी करणारे वन अधिकार्‍यांच्या सापळ्यात..
NMC News | उद्दीष्ट थोडक्यात हुकले, पाणीपट्टी वसुलीचे ५४ कोटी रुपये
अन् पाकिस्तानी खलाशांकडून ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ च्या घोषणा

Latest Marathi News जन्म-मृत्यूच्या दाखल्याचा घोळ; खासगी रुग्णालयांनी शहानिशा करावी : महापालिकेचे आवाहन Brought to You By : Bharat Live News Media.