मिरजेच्या सतार, तानपुरा वाद्यांना जीआय मानांकन

मिरजेच्या सतार, तानपुरा वाद्यांना जीआय मानांकन

जालिंदर हुलवान

मिरज : जगप्रसिद्ध असणार्‍या मिरजेतील सतार व तानपुरा या वाद्यांना केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने जीआय मानांकन दिले आहे, अशी माहिती ज्येष्ठ तंतुवाद्य बाळासाहेब मिरजकर यांनी दिली. या मानांकनामुळे मिरजेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ते म्हणाले, भौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे. जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (एखादे स्थान, गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांच्याशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. सतार व तंबोर्‍याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आमचा पाठपुरावा सुरू होता. आता त्याला यश आले आहे. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेला (मिरज सितार) व सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेला (मिरज तानपुरा) या वाद्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मिळवण्यासाठी नाबार्ड, आर. ओ., हस्तकला विभाग, उद्योग विभाग यांचे सहकार्य मिळाले. पद्मश्री रजनीकांत एक्स्पर्ट या संस्थेच्या माध्यमातून जीआयसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. 30 मार्च 2024 रोजी त्याचे रजिस्ट्रेशन मिळाले. या जीआय मानांकनामुळे वाद्यांना पारंपरिकता व विशिष्ट गुणवत्ता मिळेल. भौगोलिक मानांकनामुळे, भौगोलिक मानांकनप्राप्त वस्तूचे नाव अधिकृत वापरकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही वापरू शकत नाही. मिरज सोडून इतर कोणत्याही शहरातील तंतूवाद्याला त्याची नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणचे वाद्य मिरज या नावाने विकता येणार नाही. मिरज येथील वाद्य कलाकार उत्पादकांना आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मिरजेच्या या वाद्यांना अधिकृतपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर, सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर, संचालक अल्ताफ पिरजादे, फारुक सतारमेकर, नासीर मुल्ला, रियाज सतारमेकर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
आता मिरजेच्या सतार व तंबोर्‍याची नक्कल करता येणार नाही : मिरजकर
तंतुवाद्य निर्माते मोहसीन मिरजकर म्हणाले, या मानांकनामुळे आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे. येत्या आठ दिवसात त्याचे सर्टिफिकेटही मिळेल. आता मिरजेच्या सतार व तंबोर्‍याची नक्कल कोणालाही करता येणार नाही. शिवाय मिरजेची सतार किंवा तंबोरा म्हणून त्यांना विक्रीही करता येणार नाही.
Latest Marathi News मिरजेच्या सतार, तानपुरा वाद्यांना जीआय मानांकन Brought to You By : Bharat Live News Media.