पाणीटंचाईच्या झळा तीव्र; धरणांमध्ये ३१ टक्के साठा!

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; धरणांमध्ये ३१ टक्के साठा!

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. राज्यातील धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील 3734 गावे, वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ही परिस्थिती विचारात घेता राज्यासाठी आगामी अडीच महिने पाणीबाणीचे ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा जास्तच तापदायक ठरताना दिसत आहे. तशातच यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठाही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 541 टीएमसी म्हणजे केवळ 31 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत धरणांमध्ये 47 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये यंदा 16 टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील मोठ्या 138 धरणांमध्ये 385 टीएमसी म्हणजेच केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत राज्यातील पाणीसाठ्यात 150 टीएमसीने घट झाली आहे.
टँकरने पाणीपुरवठा!
उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाईल, तसतशा पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. गावोगावी पाण्यासाठी टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. आज राज्यातील 1153 गावे आणि 2583 वाड्या-वस्त्यांवर 1417 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला त्यामध्ये किमान शंभर ते दीडशे गावांची भर पडत आहे. आज पुणे विभागातील सर्वाधिक 1799 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण विभागातील 33, नाशिक विभागातील 1179, छत्रपती संभाजीनगर विभागातील 697 आणि अमरावती विभागातील 26 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नागपूर विभाग मात्र अजून तरी टँकरमुक्त आहे.
उपसाबंदीची चाहूल!
आज राज्यातील मराठवाडा विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 15 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. पुणे विभागातही फक्त 30 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर 40 टक्के, अमरावती 41, नाशिक 33 आणि कोकण विभागात 49 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील धरणांमध्ये असलेला मर्यादित पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी या बाबी विचारात घेता प्रामुख्याने पुणे, नाशिक आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी उपसाबंदी लागू केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरणांची अवस्था चिंताजनक!
आजघडीला राज्यातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था चिंताजनक आहे. एकूण 138 मोठ्या धरणांपैकी 17 धरणे कोरडीठाक पडली आहेत. 23 धरणांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे; तर केवळ 20 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. अन्य सर्व धरणांमध्ये 20 ते 40 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत यंदा राज्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील 17 धरणे कोरडी ठणठणीत!
राज्यातील मोठ्या धरणांपैकी 17 धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत. कोरड्या पडलेल्या धरणांमध्ये कालीसरार (नागपूर विभाग), खडकपूर्णा (अमरावती विभाग), बोरगाव-अंजनपूर, माजलगाव, रोशनपुरी, सिरसमार्ग, गुंजारगा, किल्लारी, मदनसुरी, राजेगाव, सीना-कोळेगाव, तागरखेडा, शिवनी, टाकळगाव-देवळा (मराठवाडा विभाग), पालखेड (नाशिक विभाग), लोणावळा टाटा आणि उजनी (पुणे विभाग) या धरणांचा समावेश आहे.
भारनियमनही शक्य!
कोयना धरणात 48.18 टीएमसी म्हणजेच केवळ 45 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे इथल्या वीज निर्मितीवर काहीशा मर्यादा आलेल्या आहेत. पावसाळ्यापर्यंत म्हणजे आणखी दोन-अडीच महिन्यात कोयना धरणातील पाण्याला वाढती मागणी असणार आहे. त्यामुळे कोयनेतील वीज निर्मिती कमी करून ते पाणी अन्य कारणासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागाला भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागण्याची चर्चा आहे.
Latest Marathi News पाणीटंचाईच्या झळा तीव्र; धरणांमध्ये ३१ टक्के साठा! Brought to You By : Bharat Live News Media.