साडीचा गळफास!

साडीचा गळफास!

विठ्ठल हेंद्रे, सातारा

पांडा पाटलानं महापातक केलं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेल्या मंजुळाचा त्यानं गैरफायदा घेतला, तिच्या भोळ्याभाबड्या आणि निष्पाप लेकराला देशोधडीला लावलं, पण नियतीलाही पांडा पाटलाचं हे पातक बघवलं नाही आणि तिनं त्याच्या पदरात त्याचं अचूक फळ टाकलं. ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली… ( Pudhari Crime Diary )
संबंधित बातम्या 

Pudhari Crime Diary : (अ) मानवी तस्करी!
Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी
Pudhari Crime Diary : पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत! अन् चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी

सातारा जिल्ह्यातील म्हसवड पूर्वी पंचक्रोशीतील एक मोठी बाजारपेठ होती. दर आठवड्याला तिथं मोठा बाजार भरायचा. त्या काळात म्हणजे पन्नास-साठ वर्षापूर्वी या बाजारात कित्येक हजार रुपयांची मोठी उलाढाल व्हायची. त्यामुळे साहजिकच चोरा-चिलटांचा वावर म्हणजे काही विचारता सोय नव्हती. सांगली जिल्ह्याच्या हद्दीत चोर्‍याचपाट्या करून सातारा भागात पसार होणार्‍यांचीही काही कमी नव्हती. त्यामुळे गुन्हेगारांचा मागमूस काढण्यासाठी सांगली पोलिसांचाही त्या भागात अधूनमधून काही कारणांनी राबता असायचा. असेच एकेदिवशी सांगलीचे फौजदार बाजीराव जोशी बाजारदिवशी चार-दोन पोलिस सोबतीला घेऊन गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी जातीनं हजर होते. बाजीराव फौजदार म्हणून अख्खी पंचक्रोशी त्यांना ओळखत होती आणि त्यांच्या दरार्‍यामुळे भलेभले त्यांना टरकून असायचे.
बाजीराव फौजदार हे त्या दिवशी बाजारात लावलेल्या कासिमच्या हॉटेलात बसून शेवपापडी खाता खाता बाजारावर नजर ठेवून होते आणि अचानक त्यांची नजर एका जोडप्यावर पडली. कोशा फेटा बांधलेला, अक्कडबाज मिशा असलेला एक तरणाबांड गडी आणि त्याच्या जोडीला चक्क ‘चंद्रकळा’ साडी नेसलेली एक बाई असं हे जोडपं बाजारातून फिरत होतं. बाजीराव फौजदारांना हे जरा विचित्र वाटलं, कारण त्यावेळी बर्‍यापैकी भारीतली साडी एक-दोन रुपयांपर्यंत मिळत होती. चंद्रकळा साड्या या एक तर खानदानी बायकांच्या नाहीतर सिनेमातल्या नटीच्या अंगावर दिसण्याचा तो काळ होता. त्यामुळे तर काहीसे आश्चर्य वाटून आणि काहीशा संशयास्पद नजरेतून बाजीराव फौजदार या जोडप्याला न्याहाळत बसले होते.
बाजीराव त्या ‘चंद्रकळा’वालीकडं बघत असतानाच पाठीमागून सहा-सात वर्षांचं एक उघडं-नागडं पोरगं रडत रडत आलं आणि आई म्हणून त्या बाईला त्यानं पाठीमागनं मिठी मारली. त्या बाईनं त्याला झुरळ झटकावं तसं झिडकारलं आणि सोबतच्या त्या भल्यादांडग्या माणसानं तर दोन रट्ट लावलं, तसं जास्तच भोकाड पसरून ते पोरगं रडायला लागलं.
बाजीरावांना हा सगळा प्रकार आणखीनच जास्त विचित्र वाटायला लागला आणि त्यांच्या डोक्यातला पोलिसी किडा वळवळायला लागला.
बाजीरावांनी एका पोलिसाला सांगून त्या पोराला आणायला लावलं. सुरुवातीला पोलिसांना बघून पोरगं गांगरलं, पण पोलिसांनी त्याच्याशी गोड बोलून, सोडालेमन पाजून त्याला धीर दिला आणि हळूहळू बोलतं केलं. पोराला आपलं पूर्ण नावगाव सांगता येत नव्हतं. बाजीरावांनी त्याला विचारलं, ‘तुला आता भेटलेली बाई कोण?’ पोरगं म्हणालं, ‘मला माहीत नाही’. ‘मग तू कशी काय आई म्हणून तिला मिठी मारलीस?’ पोरगं म्हणालं, ‘तिनं नेसल्यालं लुगडं माझ्या आईचं हाय, म्हणून मला वाटलं ती माझी आईच हाय.’ पोरानं आसं सांगितल्यावर बाजीराव फौजदारचं टाळकं गरगरायला लागलं. त्यांना काय चाललंय काहीच अंदाज येईना. म्हणून बाजीराव फौजदार आणि पोलिस त्या पोराला घेऊन कासिमच्या हॉटेलवर आले आणि कासिमच्या सांगण्यावरून ‘चंद्रकळेचा’ एक एक धागा उलगडत गेला.
त्या पोराचं नाव होतं देवा, सांगली जिल्ह्यातील विट्याशेजारच्या एका वाडीवरील विठ्ठल आणि मंजुळा चव्हाणचा पोरगा. विठ्ठल हा त्या भागातला एक बर्‍यापैकी म्हणजे जवळपास पंचवीस-तीस एकर जमीन जुमला आणि चार पैकं गाठीला बांधून असलेला शेतकरी गडी, पण दोन-चार वर्षांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाला होता. मंजुळा ही तरुण होती, देखणी होती आणि विशेष म्हणजे विठ्ठलच्या माघारी तिला कोणत्याही प्रकारचा जाब विचारणारं असं कुणी नसल्यामुळे साहजिकच मंजुळाचं पाऊल ‘घराबाहेर’ पडायला लागलं. अधूनमधून ती कधी एकटीच तर कधी देवाबरोबर म्हसवडच्या बाजारात यायची. तिथंच तिचं म्हसवडच्या पाटील वस्तीवरील पांडा पाटलाशी सूत जुळलं होतं. जवळपास दोन वर्षे दोघांचं ‘प्रकरण’ चालू होतं, पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंजुळा काय कुठं दिसतं नाही, पण ती गायब झाल्यापासून तिचं पोरगं देवा इथंच कुठंतरी फिरताना दिसतंय, एवढी माहिती पोलिसांना कासिमकडून समजली.
बाजीराव फौजदारांना यात नक्कीच काहीतरी काळंबेरं असावं याची शंका आली आणि त्यांनी तत्कालीन डीएसपी कुलकर्णीसाहेब यांच्याकडून मंजुळा बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी मिळवली. डीएसपीनी परवानगी देताच बाजीराव यांनी पांडा पाटलाला म्हसवडच्या त्याच्या घरातूनच उचलला. बाजीरावांच्या मारापुढं पांडा पाटलाची डाळ काही शिजली नाही आणि त्यानं घडाघडा आपल्या पापाचा पाढा वाचला.
मंजुळा पांडा पाटलावर भाळली तर होती, पण त्याचा कावा तिच्या लक्षात आला नव्हता. पांडाची नजर मंजुळाच्या जमिनीवर आणि तिच्या पैशा-अडक्यावर होती. मंजुळा पुरती कह्यात आल्यावर पांडानं तिच्या मालकीची काही जमीन तिला विकायला लावून त्या जमिनीचे जवळपास पन्नास हजार रुपये हडप केले होते, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार तंटा निर्माण होत होता, पण मंजुळा ही पांडा भेटला नाही तर ती थेट म्हसवडला त्याच्या घराकडं जायची आणि त्याच्या मागं तगादा लावायची. त्यामुळं पांडा वैतागून गेला होता. त्यातूनच त्यानं काहीही करून मंजुळाचा काटा काढायचा निर्णय घेतला.
एकेदिवशी पांडाने मंजुळाला म्हसवडला भेटायला बोलावले. पांडानं भेटायला बोलावल्यावर मंजुळा चंद्रकळा नेसून आली होती, सोबत देवा होताच. पांडाने गोड बोलून देवाला म्हसवडच्या एका हॉटेलात बसवले आणि एका बैलगाडीतून दोघे म्हसवडबाहेर पडले. कुणी चिटपाखरू बघणार नाही, अशा ठिकाणी आल्यावर पांडानं मंजुळाचा गळा घोटला. पूर्वनियोजनानुसार दोन रामोशी गडी तयारच होते. डोंगरातील एका दरीत खड्डाही काढून तयारच होता. रामोश्यांनी मंजुळाला त्या खड्ड्यात पुरून टाकले, पण मंजुळाला पुरून टाकण्याआधी पांडबाचा जीव त्या चंद्रकळेत अडकला आणि आणि मंजुळाला पुरण्यापूर्वी त्यानं ती चंद्रकळा तिच्या अंगावरून काढून घेतली.
म्हसवडला आल्यावर त्यानं ती चंद्रकळा एका धोब्याकडं धुवायला आणि इस्त्री करायला दिली. काही दिवसानंतर हीच चंद्रकळा त्यानं आपल्या बायकोला सातारच्या बाजारातून नवी आणली असं सांगून दिली होती. तिच साडी नेसून त्यादिवशी पांडबाची बायको बाजारातून पांडबाबरोबर मिरवत होती आणि बिचार्‍या देवाची ‘चंद्रकळा’ बघून फसगत झाली होती, पण नियतीच्या भाषेत सांगायचं तर फसगत देवाची नव्हं तर पांडबाची झाली होती. कारण काही दिवसातच कायद्यानं आपलं काम चोख बजावून पांडबाच्या कर्माची फळं त्याच्या पदरात टाकण्याचं काम केलं. ( Pudhari Crime Diary )
Latest Marathi News साडीचा गळफास! Brought to You By : Bharat Live News Media.