सोलापूरचा महाघातक जैविक कचरा कोल्हापुरात!

सोलापूरचा महाघातक जैविक कचरा कोल्हापुरात!

कोल्हापूर : जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) हा मानवी आरोग्याच्या द़ृष्टिकोनातून अत्यंत घातक समजला जातो. एकीकडे कोल्हापूर शहरातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणे महामुश्कील झाले आहे. तशातच आता याकामी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने सोलापुरातील तब्बल 200 टन महाघातक जैविक कचरा इथे आणून त्याचे ढीगच्या ढीग रचून ठेवले असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आलेली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी मांडलेला हा महाभयंकर खेळ असून, या प्रकारामुळे शहरात रोगराई थैमान मांडण्याची शक्यता तज्ज्ञांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
जैविक कचर्‍याची समस्या!
कोल्हापूर शहरातील आणि उपनगरांतील जैविक कचरा रोजच्या रोज गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका महापालिकेने एस. एस. सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीला दिला आहे. या घातक स्वरूपाच्या जैविक कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीला जागाही उपलब्ध करून दिलेली आहे. या कामासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने त्या ठिकाणी जैविक कचरा जाळण्यासाठी एक मशिनरी बसविली असून, या मशिनची क्षमता प्रतिदिन केवळ 2 टन जैविक कचरा जाळण्याची आहे. सध्या एस. एस. सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीकडून याच मशिनचा वापर सुरू आहे; पण कोल्हापूर शहर आणि परिसरातून गोळा होणार्‍या जैविक कचर्‍याचे प्रमाण या मशिनच्या क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे या घातक कचर्‍याची विल्हेवाट लावणे ही महापालिकेसाठी एक डोकेदुखी बनून गेलेली आहे.
दोन्हीकडे एकच ठेकेदार!
एस. एस. सर्व्हिसेस याच कंपनीला सोलापूर महापालिकेनेही आपल्या भागातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा ठेका 3 जानेवारी 2024 रोजी दिलेला आहे. मात्र, एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीने या कामासाठी लागणारा परवाना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतलेला नव्हता. विनापरवानाच त्यांनी जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने 15 मार्च रोजी एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीला आणि सोलापूर महापालिकेला नोटीस बजावून हे विनापरवाना काम बंद करण्यास भाग पाडले. तसेच एस. एस. सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीला त्या ठिकाणी साठलेल्या जवळपास 200 टन जैविक कचर्‍याची 15 दिवसांच्या आत विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. तसेच 15 दिवसांच्या आत या कामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रीतसर परवानगी घेण्याचेही आदेश दिले.
कंपनीची बनवाबनवी!
ही सगळी प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करणे शक्य नाही, अशी बाब संबंधित ठेकेदाराच्या लक्षात आली. त्यानंतर एस. एस. सर्व्हिसेस या कंपनीने गेल्या काही दिवसांत रातोरात सोलापुरातील जवळपास 200 टन जैविक कचरा ट्रक भरभरून आणून तो कोल्हापुरातील जैविक कचरा डेपोवर आणून टाकला आहे. कोल्हापुरातील जैविक कचरा निर्मूलन प्रकल्पाची मूळ क्षमताच आवश्यकतेपेक्षा कमी आहे. तशातच या सोलापुरातून आलेल्या भल्या दांडग्या कचर्‍याची भर पडली आहे. त्यामुळे या कचर्‍याची विल्हेवाट कधी आणि कशी लागणार, हा गहन सवाल आहे. कारण, या सगळ्या कचर्‍याची विल्हेवाट लागायला जवळपास शंभर दिवस लागतील. तोपर्यंत इथल्या कचर्‍याचे काय करायचे, हा सवालही आहे.
धोकादायक कचरा!
सोलापुरातून इथे आणलेला हा कचरा अधिक धोकादायक आहे. कारण, सोलापुरात याकामी पूर्वी नियुक्त केलेली जी कंपनी होती, त्यांच्या काळातच कित्येक टन कचरा साठून होता. त्यात दिवसेंदिवस भर पडत गेलेली आहे. किती दिवसांपासून हा जैविक कचरा त्या ठिकाणी सडत आहे, त्याचा कुणाला थांगपत्ताही नाही. या कचर्‍याला सोलापुरात असतानाच भयंकर दुर्गंधी सुटलेली होती. आता कोल्हापुरात येईपर्यंत त्याची काय अवस्था झाली असेल त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.
मागील जवळपास आठ-दहा दिवसांपासून कोल्हापुरातील जैविक कचरा निर्मूलन डेपोवर हा कचरा पडून आहे. तो आधीच सडलेला होता आणि इथे आणल्यापासून तो जास्तच सडून आता त्याची भयानक दुर्गंधी सुटलेली आहे. परिणामी, या कचरा डेपोत काम करणार्‍या कामगारांचे आरोग्य तर धोक्यात आलेलेच आहे; पण या सगळ्याचा फैलाव संपूर्ण शहरभर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबतीत कठोरातील कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
Latest Marathi News सोलापूरचा महाघातक जैविक कचरा कोल्हापुरात! Brought to You By : Bharat Live News Media.