वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा..

वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख. मात्र, हेच शहर आता वाहनचोरट्यांचे शहर म्हणून नवीन ओळख करू पाहत आहे. मागील सव्वातीन वर्षांत शहरातून 24 कोटी 68 लाखांची 5 हजार 822 वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, रिक्षा आणि मोटारींचा समावेश आहे.  शहरभर सीसीटीव्हीचे जाळे असूनही, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीची वाहनेही मिळत नाहीत. दुसरीकडे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून पोलिसांची नजर मात्र खिळलेली असते ती दुचाकीस्वारांना दंड करण्याकडे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ असे ब्रिद मिरविणार्‍या पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही वाहने चोरी करण्याचे धाडस करून दाखवले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने वाहनचोर्‍या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातही दुचाकीची संख्या सर्वाधिक, त्यामुळे पुण्यात वाहन चोरीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षापासून वाहनचोरी ही पुणे पोलिसांसमोरील खर्‍या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे.
या वर्षाच्या प्रारंभीपासूनच चोरट्यांनी वाहनचोरीचा धडाका लावल्याचे दिसून आले आहे. 17 मार्च 2024  पर्यंतच्या अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच तब्बल 400 वाहने चोरीला गेली आहेत. त्यांची किंमत 1 कोटी 51 लाख 84 हजार रुपयांच्या घरात आहे.
त्यामुळे शहरातील वाहनचोरींची तीव्रता किती मोठी आहे, हे दिसून येते. दिवसाला शहरातून  सहा ते सात वाहने चोरीला 8पान 4 वर
जात आहेत. कधी-कधी हेच प्रमाण नऊ ते दहाच्या घरात असते. वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
वाहनचोरीविरोधी पथके नेमकं करतात काय ?
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली. त्यांची उत्तर, दक्षिणमध्ये विभागणी करून कामांचे वाटप करण्यात आले. पण, या पथकांना वाहनचोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही.  वाहनचोरी विरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.  शहरात दररोज सात ते आठ वाहने चोरीला जात असताना ही पथके नेमकं करतात काय हे पाहण्याची वेळ आली आहे. त्यांचे कामाचे मूल्यमापन वरिष्ठ आता तरी करणार की नाही हा देखील एक मोठा सवाल आहे. एकंदर वाहन चोर्‍यांचे प्रमाण पाहात, त्यांना आळा घालण्यासाठी  वरिष्ठांनाच विशेष प्रयत्न करावे लागणार हे मात्र नक्की.
गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण अल्प
शहरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात अर्ध्यापेक्षा कमी यश येताना दिसून येते आहे. मागील वर्षी चोरीची शंभर वाहने जप्त करण्याची कामगिरी सोडता पोलिसांना चमकदार कामगिरी दाखविता आलेली नाही. त्यामुळे गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येते.
विक्रीसाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोठी साखळी
शहरातून चोरी केलेली वाहने इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगारांकडून वापरली जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. तर येथून चोरी केलेली वाहने बाहेरच्या जिल्ह्यात किंवा परराज्यात देखील विक्री केली जाते. त्यामुळे त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येते. चोरीच्या वाहनांच्या विक्रीसाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. चोरलेल्या वाहनांचे सुटे भाग करून ते विकले जातात. विदर्भ, मराठवाड्यात आणि ग्रामीण भागांत वाहनांची विक्री केली जाते. जुनी वाहने भंगारात विकली जातात.
‘परिमंडळ 5 व 4’मध्ये सर्वाधिक वाहन चोर्‍या
‘परिमंडळ पाच’मधील हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्या पाठोपाठ ‘परिमंडळ चार’मधील खडकी, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणीकंद या पोलिस ठाण्यांतही अधिक गुन्हे घडलेले आहेत.
विमा नसल्याने दिलासा नाहीच
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अलीकडील काही वर्षांत नवीन वाहनांची नोंदणी करताना कारसाठी तीन वर्षे आणि दुचाकीसाठी पाच वर्षे विमा बंधनकारक केला आहे. मात्र, जुन्या वाहनांचे विशेषत:, दुचाकीचा विमा काढण्याचे प्रमाण अत्यल्प असते. चोरीला जाणार्‍या अनेक दुचाकींचा विमा नसल्याने वाहनमालकाला विम्याचा लाभही घेता येत नाही.
हेही वाचा

Lok Sabha Election 2024 : पंजाबात भाजपा स्वबळावर
सांगलीतून लोकसभा लढणार : प्रकाश शेंडगे
Birth Rate : जननदर २०५० मध्ये १.२९ टक्क्यापर्यंत घसरणार

Latest Marathi News वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा.. Brought to You By : Bharat Live News Media.