कोल्हापूर : हेरिटेज समिती गुल, अनावश्यक गोष्टींना निधी फुल्ल
कोल्हापूर : प्राचीन-मध्ययुगीन व आधुनिक अशा सुमारे दोन हजार वर्षांचा वारसा जपणार्या कोल्हापुरातील वारसा स्थळे दुर्लक्षित असल्याने त्यांची राजरोज पडझड सुरूच आहे. वारसा स्थळांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाच्या उद्देशाने करण्यात आलेली हेरिटेज समितीच गुल असल्याने हेरिटेज वास्तूंच्या विकासाच्या नावाखाली अनावश्यक गोष्टींवर निधी फुल्ल खर्च होत असल्याचे वास्तव आहे.
काही महिन्यांपूर्वी शाहूकालीन खासबाग कुस्ती मैदानाची तटबंदी कोसळल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे कोल्हापुरातील एकूणच ऐतिहासिक वास्तूंच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न ऐरणीवर आला होता; मात्र प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनातर्फे वारसा स्थळांची यादी करण्यापलीकडे कोणतेही काम अद्याप झालेले नाही. वारसा स्थळांच्या यादीला अंतिम मंजुरी, ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धन-संरक्षण आणि देखभाल दुरुस्तीसाठी निधी या गोष्टी लांबच्या आहेत.
केवळ यादीच अपडेट
मनपा प्रशासनातर्फे सन 2003 ला ऐतिहासिक स्मारकांची यादी करण्यात आली. यात वास्तूंचा सध्याचा वापर व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व यानुसार त्यांची विभागणीनुसार पहिल्या यादीत सुमारे 78 वास्तूंचा समावेश होता. काही वर्षांपूर्वी ही यादी नव्याने स्थापलेल्या हेरिटेज समितीने पुन्हा अपडेट केली. यात जुन्या यादीतील वास्तूंसह शहरातील विविध 15 पुतळे, 8 इमारती, पर्यावरणीय परिसर, तलाव, घाट, पाणलोट क्षेत्र आदींसह 100 हून अधिक वास्तूंचा समावेश केला. यादीवर महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
ऐतिहासिक वारसा सांगणार्या वास्तू नष्ट
कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा सांगणार्या अनेक वास्तू कालौघात विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात आल्या आहेत. यात शाहूपुरी पोलिस ठाणे, प्रिन्स शिवाजी हॉल, स्टेशन बंगला, करवीर तहसील कार्यालय, भुसारीवाडा अशा अनेक वास्तूंचा समावेश आहे.
ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरूच
कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी प्रयत्न होत नसल्याने त्यांची पडझड सुरूच आहे. रंकाळा तलावाच्या तटबंदीला गळती लागली असून, कोरीव दगड खराब झाले आहेत. टॉवर व संध्यामठ मंदिराची पडझड सुरूच आहे. बिंदू चौकातील तटबंदी व बुरुजावर झाडी उगवली असून, दगड खिळखिळे झाले आहेत. खासबागच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोंडाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, सभोवताली दुरवस्था आहे. अनेक वास्तूंच्या शिखरावर झाडेझुडपे वाढली आहेत. बहुतांशी वास्तूंभोवती कचरा कोंडाळे व घाणीचा गराडा पडलेला आहे. विद्युत खांब, तारा, डिजिटल बोर्ड, सिमेंटचे बांधकाम अशा गोष्टींनी या वास्तू झाकोळल्या असून, विद्रूप झाल्या आहेत.
Latest Marathi News कोल्हापूर : हेरिटेज समिती गुल, अनावश्यक गोष्टींना निधी फुल्ल Brought to You By : Bharat Live News Media.