‘या’ मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला! मराठवाड्यात जरांगे फॅक्टर

‘या’ मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला! मराठवाड्यात जरांगे फॅक्टर

विश्लेषण : प्रमोद चुंचुवार

लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, काँग्रेस-भाजपनेही राज्यातील काही उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यात लोकसभेचे 48 मतदारसंघ असून, यापैकी अनेक मतदार संघातील लढती लक्षेवधी ठरणार आहेत. कुठे तुल्यबळ उमेदवार, कुठे बंडखोरी तर कुठे त्या त्या लोकसभा मतदार संघातील समीकरणे यांच्यामुळे या लढती रंगतदार होणार आहेत. राज्यभरात पाच टप्प्यांत निवडणूक होत असून, या निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागू शकते. महाविकास आघाडी असो की महायुती, या दोन्ही आघाड्यांमधील जागा वाटप रखडलेले आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ असून, या सर्वच मतदार संघातील लढती केवळ राज्यच नव्हे देशभरात चर्चेचा विषय ठरत असतात. बहुसंख्य कॉर्पोरेट कार्यालये व राष्ट्रीयीकृत बँकांची मुख्यालये असलेल्या दक्षिण मुंबईची लढत महत्त्वाची ठरेल. येथे शिवसेनेने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली असून, भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. सुरुवातीला येथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र, आता त्यांचे नाव मागे पडले आहे. मराठी मतदार आपल्याकडे खेचू शकेल, अशा तगड्या उमेदवाराचा शोध भाजप घेत आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांनाही कमळावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मनसेने तो फेटाळून लावला आहे. मराठी, हिंदी भाषिक, गुजराती, मारवाडी व मुस्लिम मतदार या मतदार संघात आहेत. भाजपचे बालेकिल्ले मानले जाणारे उत्तर मुंबई व मुंबई उत्तर पूर्व या मतदार संघांमध्ये एकतर्फी लढत होईल, असे चित्र आहे. उत्तर मुंबईत पियूष गोयल, तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप अन्य जागांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महाविकास आघाडीत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य ही जागा काँग्रेसला सोडून अन्य चार जागांवर शिवसेना लढेल, असा प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे. काँग्रेस वा शिवसेनेकडे भाजपच्या बालेकिल्ल्यात कडवी झुंज देऊ शकतील, असे उमेदवार नाहीत. शिवसेना शिंदे गटाकडून चित्रपट कलावंत गोविंदा यांनाही उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेना(उबाठा)चे अमोल कीर्तीकर यांच्याविरोधात उतरविण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री शिंदेंना कोंडीत पकडण्याची रणनीती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी या तीनही लोकसभा मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहेत. ठाणे ही जागा सध्या शिवसेनेला हवी असली तरी या जागेवर भाजपचा दावा आहे. या जागेवरील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या जागेवर माजी मंत्री गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देण्याची रणनीती भाजपची आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे पुन्हा रिंगणात उतरत आहेत. या मतदार संघात शिवसेना(शिंदे) पक्ष आणि भाजप यांच्यात कमालीची कटुता आहे. भाजपचे येथील आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या स्थानिक शहर अध्यक्षांवर गोळीबार केला. यानंतर या दोन्ही पक्षात वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्याचा विचार शिवसेना(उबाठा) करीत आहे. अर्थात, सध्या तरी कल्याणमध्ये शिंदे यांचे सुपुत्र व विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
विजय शिवतारे यांनी बारामती मतदार संघात निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी(अजित पवार) गटाच्या उमेदवाराच्या मतांमध्ये फुटीचा धोका आहे. यामुळे याचे परिणाम शिवसेनेला कल्याणमध्ये फटका सोसावा लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या जागेवर डॉ. शिंदे यांना बराच अंतर्विरोधाचा सामना करावा लागणार आहे. रायगड मतदार संघात सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेना(उबाठा)चे अंनत गीते ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या उमेदवारीवरून भाजप व शिवसेना(शिंदे) यांच्यात संघर्ष सुरू आहे. ही जागा कुणाला सुटते, यावरून या मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
बारामतीकडे सर्वांचे लक्ष
बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांचा सामना रंगतदार होईल. शिवसेना(शिंदे) गटाचे विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने अजित पवार यांना याच मतदार संघात अडकवून ठेवण्याची रणनीती शिंदे गटाची दिसते. शिवतारेंच्या उमेदवारीमुळे महायुतीचे मतविभाजन होईल आणि त्याचा लाभ सुप्रिया सुळे यांना होईल, असे बोलले जात आहे.
कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार असतील, तर शिवसेना(शिंदे) गटातर्फे विद्यमान खासदार बदलण्याचे संकेत आहेत. ही लढतही राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे. अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे-पाटील यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटाच्या तिकिटावर येथून लोकसभा लढून विखेंना आव्हान देण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व आमदार प्रणिती शिंदे या रिंगणात उतरणार असल्याने ही लढतही लक्षवेधी आहे. येथे नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत भाजपमध्ये अद्यापही स्पष्टता नाही.
माढा मतदार संघात तर भाजपने जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची आणि ही जागाच राष्ट्रवादी(अजित पवार) गटाला सोडण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. शरद पवारांनी माढावरून महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा पुरेपूर लाभ घेत धनगर समाजातील लोकप्रिय नेते महादेव जानकरांनी माढ्यातून उमेदवारी देऊ केली असून, त्यांनीही ती स्वीकारली आहे.
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर
मराठवाड्यात संभाजीनगरची लढत लक्षवेधी ठरणार आहे. येथे शिवसेना(उबाठा)चे चंद्रकांत खैरे हे उमेदवार असले, तरी त्यांच्यासाठी शिवसेनेचेच येथील नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काम करणार आहेत की नाही, हा प्रश्न आहे. भाजपलाही ही जागा हवी आहे. यासोबतच शिवसेना(शिंदे) गटाचा उमेदवार कोण असेल, यावरून ही लढाई महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी सांदिपान भुमरे यांचे नाव चर्चेत आहे. जालना मतदार संघात भाजपचे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेना(उबाठा)चे उमेदवार संजय लाखे-पाटील हे रिंगणात उतरत आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू जालनाच आहे. जरांगे यांनी भाजपवर अनेकदा तोंडसुख घेतले आहे. यासोबतच सगेसोयरेबाबतच्या मसुद्याला अंतिम स्वरूप सरकारने न दिल्याने मराठा आरक्षणातील आंदोलक सरकारवर नाराज आहेत. या नाराजीचा फटका दानवेंना बसू शकतो. बीडमध्ये भाजपने प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. येथे राष्ट्रवादी(शप) पक्षातर्फे मराठा आरक्षणासाठी लढलेले दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघातील जातीय समीकरणे लक्षात घेता पंकजा यांना विजयासाठी प्रचंड आव्हान असणार आहे.
रावेर मतदार संघात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली असून, एकनाथ खडसे यांच्या घरातील अन्य सदस्य त्यांच्याविरोधात लढला, तर ही लढत रंगतदार होईल. अर्थात, सध्या रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होत आहे.
विदर्भात रंगतदार लढती
अकोला मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असू शकतात. मात्र, जर ते महाविकास आघाडीत आले, तर भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविरोधातील त्यांची लढत चुरशीची राहू शकते. अमरावतीत नवनीत राणा या सध्या अपक्ष खासदार आहेत. त्यांना उमेदवारी देण्यास भाजप व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध आहे. त्यांचे जातीचे प्रमाणपत्र वैध नसल्याची भूमिका स्वतः महायुती सरकारनेच न्यायालयात घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह आहेत. मात्र, तरीही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झालेले स्थानिक आमदार बळवंत वानखेडे कडवी झुंज देतील. राणांचे महायुतीतील विरोधक काँग्रेस उमेदवाराला आतून मदत करण्याची शक्यता आहे. तसेच बच्चू कडूही आपला उमेदवार उभा करून राणांच्या मतांना सुरुंग लावतील, असे संकेत आहेत.
नागपूर मतदार संघात नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपसाठी हा किल्ला लढविणे सोपे जाणार आहे. मात्र, काँग्रेसतर्फे कुणाला उमेदवारी मिळेल, हे अद्याप गुपितच असल्याने या लढतीबाबत उत्सुकता कायम आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केल्याने ही लढतही महत्त्वाची ठरेल. येथे काँग्रेसतर्फे माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदार संघातील जातीय समीकरणे आणि बाळू धानोरकर यांच्या निधनाने प्राप्त होत असलेली सहानुभूती यामुळे प्रतिभा धानोरकरांचे पारडे जड आहे. यवतमाळ वाशीम मतदार संघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार का व त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासाठी स्थानिक भाजप नेते व शिवसेना(शिंदे) गटाचे नेते संजय राठोड मन लावून काम करणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. राठोड यांनी वेळोवेळी गवळी यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे.
Latest Marathi News ‘या’ मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला! मराठवाड्यात जरांगे फॅक्टर Brought to You By : Bharat Live News Media.