‘मविआ’चा तिढा वाढला; शरद पवार ‘मातोश्री’वर

‘मविआ’चा तिढा वाढला; शरद पवार ‘मातोश्री’वर

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असला, तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. जागावाटपावरून आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये वादविवाद सुरू असतानाच, सोमवारी धुळवडीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीत विशेषकरून भिवंडी, सांगली तसेच मुंबईतील दोन मतदारसंघांबरोबरच प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडले, तर त्या जागांचे काय करायचे, यावर खलबते केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांमधून उमेदवारांची घोषणा केली असली तर ठाकरे गटाची अधिकृतपणे पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे.
एकीकडे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन निवडणूक लढविणार की एकटेच लढणार याविषयी स्पष्टता नाहीत. त्यातच कालपरवापर्यंत सोबत असलेले महादेव जानकरही महायुतीच्या गोटात शिरले आहेत. या बदलत्या राजकिय पार्श्वभूमिवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे सवा दोन तास चर्चा झाली. या बैठकीदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील दोन जागांवर तसेच सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) तर भिंवडीच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद सुरु आहेत. सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज आहे. त्यामुळे या जागांवर तसेच काही जागांची अदलाबदल करण्यावरही चर्चा झाली.
Latest Marathi News ‘मविआ’चा तिढा वाढला; शरद पवार ‘मातोश्री’वर Brought to You By : Bharat Live News Media.