शिर्डी : राज ठाकरेंच्या एंट्रीने रंगत वाढली

शिर्डी : राज ठाकरेंच्या एंट्रीने रंगत वाढली

संदीप रोडे, शिर्डी

शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सगळी सूत्रेच बदलण्याचे संकेत मिळू लागले आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यावेळी शिर्डीतून हॅट्ट्रिक करणार काय, असा प्रश्न विचारला जात असला, तरी त्यांना उमेदवारीची चिंता लागली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नुकतीच झालेली दिल्ली भेट व त्यानंतर शिर्डीच्या जागेवर केलेल्या दाव्यामुळे खा. सदाशिव लोखंडे यांची धाकधूक वाढली आहे. तशातच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीचे जागावाटप अडल्यामुळे उमेदवारी मिळणार की नाही, या चिंतेत असलेले विद्यमान खा. लोखंडे यांची डोकेदुखी कांबळे यांच्या प्रवेशाने आणखी वाढली आहे. शिर्डी लोकसभा शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारी लोखंडे यांना की कांबळेंना, असा गुंता वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
लोखंडे हे शिर्डीचे विद्यमान खासदार असून, लागोपाठ तिसर्‍यांदा ते उमेदवारीचे दावेदार मानले जातात. शिवसेना फुटल्यानंतर लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेने या मतदार संघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी पक्की केल्याची चर्चा आहे. अजून तशी अधिकृत घोषणा झालेली नाही.
मनसेमुळे चित्र बदलले
वाकचौरे व लोखंडे यांच्यात शिर्डीमध्ये लढत होईल, हे जवळपास स्पष्ट होते. मात्र, राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेताच मनसेने मुंबई दक्षिण व शिर्डीच्या जागेवर दावा केल्याचे वृत्त येऊन थडकले. मनसे महायुतीत सामील होऊन शिर्डीची जागा मनसेला गेली, तर बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच खा. लोखंडे यांची चिंता वाढली आहे. महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असून, त्यात शिर्डीचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी केलेला प्रवेश हा उमेदवारी समोर ठेवूनच झाल्याची चर्चा रंगली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) विरुद्ध सदाशिव लोखंडे (शिवसेना) अशी लढत झाली होती. त्यात कांबळे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळे काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेत गेले. ठाकरे गटाकडून त्यांना शिर्डी लोकसभा उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, वाकचौरे यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांनी शिंदे सेनेची वाट निवडल्याचे समोर आले आहे. शिंदे सेनेकडून लोखंडेंना की कांबळे यांना उमेदवारी मिळणार, याविषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत.
खा. लोखंडे तिसर्‍या टर्मच्या प्रतीक्षेत
2009 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेचे खासदार म्हणून चर्चेत आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुढे पक्षांतर केले व 2014 ची निवडणूक काँग्रेसकडून लढविली. त्यावेळी शिवसेनेने सदाशिव लोखंडे हा नवखा चेहरा समोर आणला होता. वाकचौरे-लोखंडे लढतीत वाकचौरेंचा पराभव करून लोखंडे शिर्डीचे खासदार बनले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी ही जागा स्वतःकडे राखली. त्यामुळे ते यावेळी तिसर्‍यांदा उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसचे माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांचे समर्थक होते. 2009 मध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ससाणे यांनी कांबळे यांना पुढे करत विधानसभेची उमेदवारी खेचून आणली. यानंतर शिवसेनेचे भाऊसाहेब डोळस यांचा पराभव करून कांबळे हे पहिल्यांदा आमदार झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा ही जागा जिंकली. त्यावेळी त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे (भाजप), लहू कानडे (शिवसेना) आणि सुनीता गायकवाड (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला होता. कांबळे यांनी 2019 मध्ये शिर्डी लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढविली. मात्र, पदरी पराभव पडल्यानंतर ते शिवसेनेत गेले. कानडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 च्या श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला.
Latest Marathi News शिर्डी : राज ठाकरेंच्या एंट्रीने रंगत वाढली Brought to You By : Bharat Live News Media.