‘कोल्हापूर’मधून महायुतीचा मीच उमेदवार : संजय मंडलिक

‘कोल्हापूर’मधून महायुतीचा मीच उमेदवार : संजय मंडलिक

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून महायुतीचा उमेदवार आपणच असणार आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते आपल्यासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त करून खा. संजय मंडलिक यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान तेरा खासदारांची उमेदवारी निश्चित असल्याचे बुधवारी सांगितले.
उमेदवारीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाल्यानंतर खा. मंडलिक यांनी थेट मुंबई गाठली होती. दोन दिवसांनी ते बुधवारी पहाटे कोल्हापुरात आले. त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होती. दुपारी त्यांची पत्रकारांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, उमेदवारीबाबत उलटसूलट चर्चा पाहून माझ्या मनातही संभ—म निर्माण झाला होता. म्हणून मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी तुम्ही का इकडे आला, असे विचारले असता आपण उमेदवारीच्या चर्चेबाबत सांगितले. तेव्हा शिंदे यांनी उमेदवारीच्या चर्चेत तुम्ही गुंतू नका. आचारसंहिता लागणार आहे. कामे उरकून घ्या, उमेदवारीबाबत मी तुम्हाला शब्द दिला आहे. काळजी करू नका. सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार, असे ते म्हणाले.
गेल्यावेळी आपण भाजप-शिवसेनेचा उमेदवार होतो. यावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे. आपल्या उमेदवारीबाबत संभ—मावस्था निर्माण करणार्‍या कुजक्या मेंदूचा शोध घेत आहे. थोडा वेळ लागेल; पण तो सापडेल. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात मी मागेच असणार, असे सांगून मंडलिक म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना अकरा खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर मी पाठिंबा दिला आहे. आपण जर पाठिंबा दिला नसता, तर अकरा लोकांची अडचण झाली असती. त्यामुळे जाणे आवश्यक होते. त्याचवेळी ज्या गोष्टी ठरल्या त्यामध्ये लोकसभा उमेदवारीचा शब्द होता. निवडणुका म्हटले की, प्रत्येकजण आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे आग्रह धरणार, नवनवीन नावे येणार हे आता होत राहणार. महायुतीचा उमेदवार मात्र आपणच असणार आहे.
वडिलांना जो संघर्ष करावा लागला तोच माझ्या वाटणीला येतो काय, या काळजीत कार्यकर्ते होते. सकाळपासून गर्दी केली होती. शाहू महाराजांनी स्वत: मी निवडणूक लढविणार नाही, असे आपणास सांगितले होते. चर्चेवर विश्वास ठेवू नको, निवडणूक लढण्याचे ठरले की मी सांगेन, असे शाहू महाराज मला म्हणाले होते, असे मंडलिक यांनी सांगितले.
Latest Marathi News ‘कोल्हापूर’मधून महायुतीचा मीच उमेदवार : संजय मंडलिक Brought to You By : Bharat Live News Media.