धुळ्याच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३२ कोटींची नुकसान भरपाई मिळवून देण्यात प्रशासनाला यश

धुळ्याच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३२ कोटींची नुकसान भरपाई मिळवून देण्यात प्रशासनाला यश

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३२ कोटी ०६ लाख रूपये इतकी नुकसान भरपाई मिळवुन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार संपूर्ण धुळे जिल्हयात राष्ट्रीय महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये प्रलंबित ६१६२ प्रकरणे व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे सुमारे ९५,१६३ प्रकरणे असे एकुण १,०१३२५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित ४१० व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे ३०,६५१ असे एकुण ३१,०६१ प्रकरणे निकाली निघुन रक्कम रूपये ३२ कोटी ०६ लाख ९१ हजार १७८/- इतकी तडजोडीची रक्कम लोकअदालतीमध्ये वसुल झाली. अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप वि. स्वामी यांनी दिली.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादाच्या प्रकरणांपैकी १० प्रकरणामध्ये यशस्वीपणे समुपदेशन करून १० दांपत्यांना पुन्हा नांदायला पाठविण्यात आले. तसेच वृध्दाश्रमात राहणा-या एका वयोवृष्द महिलेला तिचे दोन्ही मुले सांभाळत नव्हती, त्यामुळे मुलांविरूध्द न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते. सदरचे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते .सदर प्रकरणात यशस्वीरित्या तडजोड घडवुन आणण्यात आली . सदर महिलेला तिच्या मुलांनी घरी घेवुन जाण्यास तयारी दर्शविली. त्यांनी त्यांच्या आईचा उपचार तसेच भावी काळात योग्य पध्दतीने सांभाळण्याची लोकअदालत समोर शाश्वती दिली. ते त्यांच्या आईला सोबत घरी घेवून गेले.
तसेच मोटार अपघात नुकसान भरपाईचे एका प्रकरणामध्ये ५९ लाख रूपये नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली. मोटार अपघात नुकसान भरपाईची एकुण १११ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. ५ कोटी पेक्षा जास्त रक्कम पक्षकारांना मिळवून देण्यात आली.
लोकअदालतसाठी पक्षकार, न्यायाधीश, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य तसेच तालुका वकील संघ, पोलीस व सर्व कर्मचारी वर्ग इत्यांदीनी अमुल्य सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद व न्यायाधीश तथा सचिव संदीप वि. स्वामी यांनी आभार व्यक्त केले.
Latest Marathi News धुळ्याच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३२ कोटींची नुकसान भरपाई मिळवून देण्यात प्रशासनाला यश Brought to You By : Bharat Live News Media.