बिबट्याचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसिद्ध करत केला ‘एप्रिल फुल’; वनविभागाची धावाधाव!

बिबट्याचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसिद्ध करत केला ‘एप्रिल फुल’; वनविभागाची धावाधाव!

ग्रामस्थात भीतीचे वातावरण
युवराज भित्तम / म्हासुर्ली

गेल्या आठ-दहा दिवसापासून म्हासुर्ली (ता.राधनगरी) परिसरात बिबट्याचा वावर आहे. याबाबत वनविभाग युध्दपातळीवर शोध घेत आहे.मात्र सोमवारी सकाळी समाज माध्यमावर काहींनी झापाचीवाडी लघुपाटबंधारे येथे बिबट्या असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.परिणामी वन विभागाने घटनास्थळी धाव घेत संबंधित छायाचित्राची खात्री केली असता सदर माहिती अफवा असल्याचे सिद्ध झाल्याने ‘एप्रिल फुल’ केल्याचे समजले.
गेल्या आठ -दहा दिवसापासून म्हासुर्ली परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी दक्ष असून परिसरातील दोन दिवसा पूर्वी डोंगर व शेत शिवाराची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी केली आहे.मात्र यात बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यातच सोमवार सकाळी काहींनी समाज माध्यमावर झापाचीवाडी प्रकल्पाजवळ बिबट्या असल्याचे छायाचित्र मथळ्यासह प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली.परिणामी जनतेत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले.तर अनेकांनी वृत्त खरे असल्याचे समजून आपल्या मोबाइलवर बिबट्याच्या छायाचित्राचा स्टेटस ही लावला.त्यामुळे वन विभागाची यंत्रणा वेगाने कामाला लागली. कर्मचाऱ्यांनी दिवसभर धावपळ करत परिसरामध्ये शोध मोहीम राबवत वृत्ताची खातरजमा केली असता सदर वृत्त अफवा असल्याचे सिद्ध होत ‘एप्रिल फुल’ केल्याचे स्पष्ट झाले.
मात्र या सर्व प्रकाराची म्हासुर्ली वन परिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत समाज माध्यमावर छायाचित्र पाठवलेल्या व्यक्तीचा शोध दिवसभर सुरू ठेवला तर काहींची भेट घेत सदर वृत्ताची खातर जमा केली. याकामी वन विभागाचे वनपाल विश्वास पाटील,वनरक्षक उमा जाधव,वनसेवक संजय पानारी,जोतिराम कवडे यांनी दिवसभर बिबट्याच्या शोध मोहीमेत सहभाग घेतला.
अफवांच्यावर विश्वास ठेवू नका..!
म्हासुर्ली भागातील बिबट्याचा वावर शोधण्यासाठी वन विभागा सर्व पर्याय वापरत आहे.मात्र समाज माध्यमावरती प्रसिद्ध झालेले छायाचित्र व मजकूर चुकीचा होता. सदर छायाचित्र हे मुंबई मानखुर्द येथील असून अशा अफवांच्या वर लोकांनी विश्वास ठेवू नये.तसेच येथून पुढे अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर प्रसिद्ध करणाऱ्या वर कारवाई केली जाईल.
–विश्वास पाटील, वनपाल,म्हासुर्ली वनपरिमंडळ.