अहं खलु ईदम सर्वंम

अहं खलु ईदम सर्वंम

अध्याय पहिला
बाप्पा म्हणाले, उत्पत्ती, स्थिती आणि लय हा ईश्वरी खेळ आहे आणि तो व्यवस्थित चालू रहावा म्हणून मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रुपात कार्य करत असतो. सृष्टीतील निरनिराळी कार्ये अव्याहतपणे चालू रहावीत म्हणून माझी निरनिराळी रूपे वेगवेगळी कामे अखंड करत असतात. हे लक्षात घेतले तर सर्व देवांच्या रुपात मीच नटलेला आहे हे लक्षात येते. हे जाणणे हेच ब्रह्मज्ञान होय परंतु काही लोक माझ्या निरनिराळ्या रुपात मला न पाहता प्रत्येक देव वेगवेगळा आहे असे मानतात आणि त्यांच्या गरजेनुसार निरनिराळ्या देवतांची उपासना करत असतात. मी भक्तांचा चाहता असल्याने मीही त्यांनी केलेल्या उपासनेमुळे संतुष्ट होऊन त्यांनी मागितलेले फल त्यांच्या दृष्टीने मिळणे योग्य असल्यास त्यांना बहाल करतो. त्यामुळे निरनिराळ्या देवतांच्या उपासना समाजात प्रकट झाल्या हे लक्षात न घेता मी ज्या देवाची उपासना करतोय तोच देव सर्वश्रेष्ठ आहे असा त्या देवाचे अभिमानी लोक इतर देवतांची उपासना करणाऱ्या लोकांबरोबर वाद घालत असतात. वस्तुत: कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती माझीच उपासना असते. हे समजून घेणे ह्यालाच अभेदबुद्धियोग म्हणजे बुद्धीचा भेद न करणारा योग किंवा बुद्धिभेद होऊन मनात शंका उत्पन्न न करणारा योग असं म्हणता येईल. तुकाराम महाराजांनी हा अभेदबुद्धियोग अचूक जाणला होता म्हणून ते त्यांच्या अभंगात म्हणतात,
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ।हे तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला । ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न तो हा गजानन मायबाप । तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचिया ।
राजाला अभेदबुद्धियोग समजावून सांगताना बाप्पा पुढील श्लोकात म्हणाले,
अहमेव जगद्यस्मात्सृजामि पालयामि च।
कृत्वा नानाविधं वेषं संहरामि स्वलीलया ।। 22 ।।
अर्थ-आपल्या लीलेने नाना प्रकारचे रूप धारण करून मीच जगाची उत्पत्ती करतो, पालन करतो व संहार करतो.
अहमेव महाविष्णुरहमेव सदाशिव: ।
अहमेव महाशक्तिरहमेवार्यमा प्रिय ।। 23।।
अर्थ- हे प्रिया, मीच महाविष्णु आहे, मीच सदाशिव आहे, मीच महाशक्ति आहे, मीच सूर्य आहे.
अहमेको नृणां नाथो जात: पञ्चविध: पुरा ।
अज्ञानान्मा न जानन्ति जगत्कारणकारणम् ।।24।।
अर्थ-मीच एक भूतांचा स्वामी असून पाच प्रकारचा आहे. जगताचे आदिकारण असलेल्या मला लोक अज्ञानामुळे जाणत नाहीत.
मत्तोग्निरापो धरणी मत्त आकाशमारुतौ ।
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च लोकपाला दिशो दश ।। 25 ।।
वसवो मनवो गावो मनव: पशवोपि च ।
सरित: सागरा यक्षा वृक्षा: पक्षिगणा अपि ।। 26।।
तथैकविंशति: स्वर्गा नागा: सप्त वनानि च ।
मनुष्या: पर्वता: साध्या: सिद्धा रक्षोगणास्तथा।। 27।।
अर्थ-अग्नि माझ्यापासून उत्पन्न झाला, उदक माझ्यापासून उत्पन्न झाले, पृथ्वी माझ्यापासून उत्पन्न झाली, आकाश, वायु, ब्रह्मा, विष्णु, रुद्र, इंद्रादि लोकपाल, दहा दिशा, अष्टवसु, चवदा मनु, गाई, मुनि, पशु, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष, पक्षीगण, तसेच एकवीस स्वर्ग, नऊ नाग, सात वने, मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध, राक्षससमुदाय, हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत.
विवरण-बाप्पांच्या वरील श्लोकातून सांगण्यावरून सर्व देविदेवता ही बाप्पांचीच रूपे आहेत आणि हे सर्व विश्व त्यांनीच व्यापलेले आहे म्हणजेच ते ब्रह्मरूपच आहेत हे स्पष्टपणे लक्षात येते पण व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या म्हणीनुसार अभेद्बुद्धीयोग न समजून घेणारे लोक निरनिराळ्या देवतांची उपासना करत असतात. असे जरी असले तरी बाप्पा त्यांच्या उपासनेमुळे प्रसन्न होऊन त्यांना हवे ते फल देत असतात.
क्रमश: