खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना वेग

खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना वेग

दोन दिवसांपासून पावसाची थोड्या प्रमाणात उघडीप : उद्यापासून मृग नक्षत्रावर पेरणी शक्य : मशागतीसाठी ट्रॅक्टरना मागणी 
वार्ताहर /किणये 
तालुक्यात खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला जोरदार सुऊवात झाली आहे. यामुळे शेतशिवार गजबजू लागली आहेत. यंदा दमदार वळिवाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात ओलावा निर्माण झाला होता. पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे मशागतीची कामे खोळंबली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थोड्या प्रमाणात उघडीप दिली असल्यामुळे या मशागतीच्या कामांना जोर आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरी व कल्टी मारण्यात येत आहे. तसेच मशागत करण्यात येत आहे. काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने नांगरण व कुळवण करून मशागत करू लागले आहेत. ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी प्रति तासाला सहाशे ते सातशे ऊपये इतके भाडे देण्यात येत आहे. तसेच बैलजोडीसह एका शेतकऱ्याला एक दिवसासाठी मशागत करण्यासाठी एक हजार ते पंधराशे ऊपये अशी मजुरी देण्यात येऊ लागली आहे. या ट्रॅक्टरच्या भाड्यात व शेतकऱ्यांच्या मजुरीमध्ये त्या त्या भागानुसार बदल आहे.
ओलावा कमी झाल्याने नांगरण-मशागत सोयीस्कर
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी नदी, नाले प्रवाहित झाले होते. मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिली असल्याने शिवारात मशागतीची कामे करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वळिवाचा अधिक पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणच्या शेतांमध्ये पाणी साचले होते. अधिक ओलावा निर्माण झाल्यामुळे मशागत करणे कठीण झाले होते. दोन तीन दिवसांपासून ऊन पडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असल्याने त्यामध्ये नांगरण व मशागत करणे सोयीस्कर होऊ लागले आहे.
जोरदार वळिवामुळे बऱ्याच पिकांना नवसंजीवनी
याचबरोबर शेतशिवारामध्ये शेणखताची फवारणी शेतकरी वर्ग करू लागले आहेत. यंदा कडक उन्ह पडले होते. तसेच उष्णतेमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे शेतशिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली होती. बरीच पिके सुकून जाण्याच्या मार्गावर होती. मात्र याचवेळी जोरदार वळिवाचा पाऊस झाला आणि बऱ्याच पिकांना नवसंजीवनी मिळाली.
बी-बियाणे-खताची शेतकऱ्यांकडून जमवाजमव 
अलीकडे उसाचे पीक अधिक प्रमाणात घेण्यात येऊ लागले आहे. पावसाअभावी ऊस पीक वाळून जात होते. पण वळिवाच्या पावसामुळे ऊस पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले. सध्या शेतकरी शिवारामध्ये मशागतीच्या कामात गुंतलेला आहे. कोणत्या शिवारात कोणकोणती पिके घ्यायची, याचे नियोजन बळीराजा करू लागला आहे. बी-बियाणांचा व खतांचा साठा, त्याची जमवाजमव शेतकरी करताना दिसत आहेत.
 पश्चिम भागात रताळी लागवडीची तयारी 
तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या रताळी लागवड करण्यासाठी शेतशिवारात बांध (मेरा)ट्रॅक्टरच्या साह्याने ओढण्यात येऊ लागल्या आहेत. प्रारंभी शिवारात शेणखताची फवारणी करण्यात येत आहे. त्यानंतर ट्रॅक्टरने बांध तयार करण्यात येऊ लागले आहेत. एकंदरीतच खरीप हंगामातील मशागतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. शुक्रवार दि. 7 रोजी उत्तर रात्री एक वाजून पाच मिनिटांनी मृग नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बळीराजाची लगबग सुरू झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हंगामानुसार शेतशिवारामध्ये पेरणी सुरू
खरीप हंगामात भात, भुईमूग, सोयाबीन, बटाटा, रताळी, नाचणा आदी पिके प्रामुख्याने शेतकरी घेतात. मे महिन्याच्या 18 ते 20 तारखेपासून तालुक्यात धूळवाफ पेरणीला सुऊवात होते. यंदा मात्र याच कालावधीत वळिवाचा जोरदार पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना धूळवाफ पेरणी करता आली नाही. त्यामुळे हंगामानुसार सध्या सदर शेतकरी शेतशिवारामध्ये पेरणी करू लागले आहेत. तालुक्यात बासमती, इंद्रायणी, सोना मसुरी, सोनम, मधुरा, इंटान, दोडगा, भाग्यलक्ष्मी, चिंटू आदींसह इतर नवनवीन जातीच्या भाताची पेरणी करण्यात येते. या पेरणीसाठी लागणाऱ्या भाताची जमावाजमव शेतकरी वर्ग करू लागले आहेत.