बळीराजाला पेरणीचे संकेत देणारा मृगाचा किडा !

बळीराजाला पेरणीचे संकेत देणारा मृगाचा किडा !

सावंतवाडी
भारतात नैऋत्य मोसमी वारे धडकले असून पावसाचे आगमन झाले आहे. पावसाच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्र लागते. पहिल्या पावसाच्या सरी बरसताना भारतीय पंचांगाप्रमाणे सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. मृग नक्षत्रात मृगाचा किडा जमिनीत आढळतो. मृग नक्षत्रात हा किडा आढळून येत असल्याने या किड्याला मृग किडा असे म्हटले जाते. ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात असे मानले जाते. याच काळात शेतकरी पेरणीला सुरुवात करतो. भारतीय संस्कृतीत निसर्गातील संकेतांना महत्त्व आहे. जसे वाळवी आपले पंख सोडू लागली की पाऊस येणार असे मानले जाते त्याचप्रमाणे हा मृगाचा किडा जमिनीत दिसला की पावसाचे आगमन होणार आहे याची चाहूल शेतकऱ्यांना लागते. पहिल्या नक्षत्राच्या वेळी 15 ते 20 दिवस हा किडा आढळून येतो. त्यानंतर जसे जसे मृग नक्षत्र संपून आद्रा नक्षत्र सुरू होते तसा पावसाचा जोरही वाढू लागतो. त्यानंतर हा किडा बघायला मिळत नाही. बळीराजाला हा किडा दिसल्यानंतर पेरणीचा संकेत मिळतो. आणि त्यानंतर ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पेरणीची लगबग सुरू होते.