घटप्रभेत 2.5 टीएमसी पाणी सोडणार

घटप्रभेत 2.5 टीएमसी पाणी सोडणार

प्रादेशिक आयुक्तांची माहिती : पाण्याचा सदुपयोग करून घेण्याचे आवाहन
► प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीमध्ये दि. 1 एप्रिलपासून 2.5 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी दिली आहे.
बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने जलाशयातून पाणी सोडले जात आहे. यासाठी हिडकल जलाशयातून घटप्रभा उजव्या कालव्यात जेआरबीएस चिकोडी उपविभाग (सीबीएस), तसेच मार्कंडेय कालव्याला दि. 10 एप्रिल ते 20 एप्रिल असे एकूण 10 दिवस पाणी सोडले जाणार आहे. तसेच घटप्रभा डाव्या कालव्यातून जेएलबीसी कालव्यांना दि. 20 एप्रिल ते दि. 30 एप्रिलपर्यंत एकूण दहा दिवस पाणी सोडले जाणार आहे, असे प्रादेशिक आयुक्तांनी कळविले आहे.
सध्या बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. याबरोबरच पावसाचे प्रमाण कमी झाल्याच्या कारणाने नागरिकांसह जनावरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीमध्ये पिण्याच्या उद्देशाने पाणी सोडले जात आहे. बागलकोट आणि यामध्ये येणाऱ्या गावांसाठी सरकारच्या आदेशानुसार 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. कोटबागी, कालमडी, श्रीरामेश्वर पाणी उपसा योजनांना पाणी सोडले जाणार आहे.
पाण्याचा सदुपयोग करून घ्या : मंत्री सतीश जारकीहोळी
हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीवरील उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. 2.5 टीएमसी पाणी सोडले जात असून याचा लाभ बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना होणार आहे. पाणी वाया जाऊ नये यासाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.