जगातील सर्वात कमी आकाराचा साप

जगातील सर्वात कमी आकाराचा साप

बार्बाडोस थ्रेड नावाचा साप नसतो विषारी
जगात असे अनेक साप आहेत, जे अत्यंत विषारी असतात. तर काही सापांपासून माणसांना कुठलाही धोका नसतो. कारण हे साप बिनविषारी असतात. परंतु एका सापाला जगातील सर्वात छोटा साप मानले जाते. बार्बाडोस थ्रेड नावाचा हा साप सध्या चर्चेत आला आहे.
बार्बाडोस थ्रेडला जगातील सर्वात छोट्या सापाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याची लांबी 3.94 पासून 4.09 इंचादरम्यान असते. आश्चर्याची बाब म्हणजे हा साप अंध असतो, म्हणजे याला काहीच दिसत नाही. अशा स्थितीत हा साप प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी खाऊन जिवंत राहतो. परंतु हा साप विषारी नसतो. अशा स्थितीत जर या सापाने दंश केला तर माणसाला किरकोळ जखम आणि वेदनेशिवाय काहीच होत नाही.
2008 मध्ये या सापाचा शोध लागला होता. हा छोटा साप पूर्व कॅरेबियन बेट बार्बाडोसमध्ये आढळला होता. यामुळे याचे नाव देखील बार्बाडोस ठेवण्यात आले आहे. हा साप धाग्याप्रमाणे अत्यंत बारीक असतो. हा साप विषारी नसतो असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
सापाला बार्बाडियन जंगलात एका खडकाला वळवळताना पाहिले गेले होते. हा साप जवळपास 3100 ज्ञात सापाच्या प्रजातींमध्ये सर्वात कमी आकाराचा असल्याचे पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ एस. ब्लेयर यांनी सांगितले आहे.  हा जगातील सर्वात छोटा साप असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कुठलेच कारण सध्या नाही. बार्बाडोस जीव एकप्रकारचा थ्रेड स्नेक असून त्याला वर्म स्नेक देखील म्हटले जाऊ शकतो, हा साप प्रामुख्याने उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये आढळून येतो असे वॉशिंग्टनमधील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये उभयचर आणि सापांचे क्यूरेटर जीवशास्त्रज्ञ रॉय मॅकडिआर्मिड यांनी म्हटले आहे.