भारतीय महिला हॉकी संघ पराभूत

भारतीय महिला हॉकी संघ पराभूत

वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सुरु असलेल्या महिलांच्या प्रो-लिग हॉकी स्पर्धेतील ब्रिटनच्या टप्प्यामध्ये शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जर्मनीने भारताचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. भारताचा हा या स्पर्धेतील पाचवा पराभव आहे.
भारत आणि जर्मनी यांच्यातील झालेल्या या सामन्यात 13 व्या मिनिटाला चार्लोटीने जर्मनीचे खाते मैदानी गोलवर उघडले. 23 व्या मिनिटाला भारतीय संघातील दीपिकाने शानदार गोल करुन आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. 24 व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या सोनजाने अचूक गोल करुन जर्मनीला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत जर्मनीने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. 37 व्या मिनिटाला जर्मनीला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि लोरेंझ निकेने आपल्या संघाचा तिसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या सांघिक मानांकनात जर्मनी सध्या तिसऱ्या तर भारत नवव्या स्थानावर आहे. प्रो-लिग हॉकी स्पर्धेच्या युरोपीयन टप्प्यामध्ये भारतीय महिला संघाने यापूर्वी चार सामना गमविले आहेत. बेल्जियमने तसेच अर्जेंटिनाने भारताचा प्रत्येकी 2 वेळा पराभव केला आहे. भारतीय महिला संघाचा आता या स्पर्धेतील पुढील सामना ब्रिटन बरोबर रविवारी उशिरा होत आहे.