स्पोर्ट्स mania

भारतीय ‘टेटे’ची ‘पोस्टर गर्ल’…मनिका बात्रा ! भारतातील महिला टेबल टेनिसची मशाल मागील काही वर्षांपासून वाहणारी मनिका बात्रा नुकतीच पुन्हा एकदा प्रकाशात आली ती ‘सौदी स्मॅश’मध्ये आपल्याहून अव्वल खेळाडूंना धूळ चारल्यानं…या कामगिरीच्या जोरावर ती विश्वातील एकेरीतील पहिल्या 25 खेळाडूंत पोहोचलीय अन् असं स्थान पटकावणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू सुद्धा ठरलीय… सौदी स्मॅश’मध्ये जेव्हा ती उतरली […]

स्पोर्ट्स mania

भारतीय ‘टेटे’ची ‘पोस्टर गर्ल’…मनिका बात्रा !
भारतातील महिला टेबल टेनिसची मशाल मागील काही वर्षांपासून वाहणारी मनिका बात्रा नुकतीच पुन्हा एकदा प्रकाशात आली ती ‘सौदी स्मॅश’मध्ये आपल्याहून अव्वल खेळाडूंना धूळ चारल्यानं…या कामगिरीच्या जोरावर ती विश्वातील एकेरीतील पहिल्या 25 खेळाडूंत पोहोचलीय अन् असं स्थान पटकावणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू सुद्धा ठरलीय…
सौदी स्मॅश’मध्ये जेव्हा ती उतरली तेव्हा आपल्या कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा ठरेल, आपल्या हातून आजवरचे सर्वोत्तम विजय नोंदविले जातील असं तिला वाटलं देखील नसेल…या स्पर्धेतील तिची घोडदौड भलेही उपांत्यपूर्व फेरीत अडविली गेली असेल. परंतु त्यापूर्वी जागतिक क्रमवारीतील अव्वल 20 पैकी दोन खेळाडूंना तिने धूळ चारण्याचा पराक्रम करून दाखविला…शिवाय ती ‘वर्ल्ड टेबल टेनिस ग्रँड स्मॅश’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पाऊल ठेवणारी एकेरीतील पहिली भारतीय खेळाडू ठरली (2021 पासून सुरू असलेल्या ‘ग्रँड स्मॅश’ या टेनिसमधील ‘ग्रँड स्लॅम’च्या धर्तीवरील टेबल टेनिसच्या जगतातील महत्त्वाच्या वार्षिक स्पर्धा)…मनिका बात्रा…भारतीय टेबल टेनिसची ‘पोस्टर गर्ल’…
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानी असलेल्या रोमानियाच्या अँड्रिया ड्रॅगोमनला मनिकानं पराभूत केलं. मात्र सर्वांत खास अन् खळबळ उडवून देणारा राहिला तो चिनी वांग मन्यूवरचा विजय. विश्वात दुसऱ्या स्थानावर असलेली वांग 32 स्पर्धकांच्या फेरीतील त्या सामन्यात उतरली तेव्हा आपण बात्राचा सहज फडशा पाडू असा विचार तिनं केलेला असेल. पण प्रत्यक्षात घडलं ते भलतंच. त्यापूर्वी वांगविरुद्धचे सलग पाच सामने गमावलेल्या मनिकाचा चिनी खेळाडूवरील हा पहिलाच विजय…पहिला गेम गमावल्यानंतर देखील तिनं मोठं पुनरागमन करताना काही उत्कृष्ट ‘डाउन-द-लाइन पुश’चं दर्शन घडविलं आणि वांगचे जबरदस्त स्मॅश अडवून दाखविले. चौथ्या गेममध्ये तर मनिका बात्रानं आपला सर्वोत्कृष्ट खेळ करून दाखविताना शेवटच्या टप्प्यात सलग चार गुण खिशात घालत 8-10 अशा पिछाडीवरून 12-10 अशी बाजी पलटविली…
त्यानंतर मनिकानं स्पर्धेतील आणखी एका मोठ्या धक्क्याची नोंद केली ती उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या नीना मिटेलहॅमचा पराभव करून. जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या नीनावर मात करण्याची सुद्धा तिची ही पहिलीच खेप. मनिकाला नीनाविऊद्धच्या त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये केवळ दोन गेम जिंकता आले होते. परंतु ‘सौदी स्मॅश’मध्ये तिनं निर्विवाद वर्चस्व राखलं अन् सरळ गेम्समध्ये सामना संपविला. तीन गेम्समध्ये नीनाला जिंकता आले केवळ 22 गुण…
शेवटी मनिकाची वाटचाल संपुष्टात आणली ती जपानची माजी आशियाई विजेती हिना हयातानं. त्यातही भारतीय टेबल टेनिसपटूनं आपल्या मजबूत फोरहँडचा चांगला उपयोग करून सुऊवातीचा गेम जिंकत आघाडी घेतली होती. परंतु हयातानं उसळी घेऊन पुढील चार गेम्सवर ताबा मिळविला. या दोन्ही खेळाडूंची त्यापूर्वी चार वेळा गाठ पडली होती अन् हयाताविऊद्धचा हा बात्राचा तिसरा पराभव…
‘सौदी स्मॅश’मधील धडाक्यावर स्वार होऊन मनिका बात्रानं जागतिक क्रमवारीत चक्क 15 स्थानांची झेप घेतलेली असून महिलांच्या एकेरी गटात कारकिर्दीतील सर्वोच्च 24 वं स्थान पटकावलंय. एकेरीतील पहिल्या 25 टेबल टेनिसपटूंमध्ये एखाद्या भारतीय महिला खेळाडूनं प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ…सर्व भारतीय खेळाडूंचा विचार करता टेबल टेनिसच्या एकेरी विभागात सर्वोच्च स्थान मिळविण्याचा पराक्रम होता तो साथियान ज्ञानशेखरनच्या खात्यावर. त्याच्याशी तिनं  बरोबरी केलीय. साथियान हा बात्राचा दीर्घकाळापासून मिश्र दुहेरीतील साथीदार राहिलेला असून 2019 साली तो पुऊष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर पोहोचला होता…
त्याशिवाय मनिका बात्रानं भारतीय महिला टेबल टेनिसपटूंमधील आपलं अग्रस्थानही परत मिळविण्यात यश प्राप्त केलंय. गेल्या महिन्यात श्रीजा अकुलानं तिची जागा घेतली होती अन् सहा वर्षांत प्रथमच आपलं अव्वल स्थान गमावण्याचा प्रसंग तिच्यावर आला होता. श्रीजाची आता तीन स्थानांनी घसरण झाली असून ती जागतिक क्रमवारीत 41 व्या स्थानावर पोहोचलीय…आपल्या कारकिर्दीत यापेक्षा चांगलं स्थान मनिकानं पाहिलं होतं ते 2022 साली महिलांच्या दुहेरी गटातील क्रमवारीत. त्यावेळी अर्चना कामतसह ती चक्क चौथ्या क्रमांकावर पोहोचली होती. कुठल्याही भारतीय टेबल टेनिसपटूला आजवर इतकी भरारी मारता आलेली नाहीये…
या साऱ्या घडामोडींचा परिपाक म्हणजे झपाट्यानं जवळ पोहोचणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनिका बात्राचा पुन्हा वाढलेला आत्मविश्वास, मिळालेली आवश्यक गती. खास करून यंदाची सुरुवात संथ राहिल्यानंतर अन् पॅरिस ऑलिम्पिकमधील मिश्र सांघिक गटातील स्थान गमवावं लागल्यानंतर असा एक ‘बूस्टर डोस’ अत्यंत गरजेचा होता…तसं पाहिल्यास मनिकासाठी मागील काही वर्षं खडतरच राहिलीत ती महासंघाविरुद्धचा न्यायालयीन लढा, प्रशिक्षक बदलणं आणि आपल्या क्षमतेस न्याय देण्यात, एकेरीत पुरेशी पदकं जिंकण्यात आलेलं अपयश यामुळं…पॅरिस ऑलिम्पिकला तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलाय अन् या कालावधीत मिळालेल्या धड्यांपासून बोध घेऊन ही 28 वर्षीय टेबल टेनिसपटू ‘सौदी स्मॅश’प्रमाणं तिथंही ठसा उमटविण्यास सज्ज होतेय!
2018…कारकिर्दीतील जबरदस्त साल…

मनिका बत्रा ही सर्वप्रथम गाजली ती गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया इथं 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतून. त्यावेळी तिनं चार पदकं जिंकली, त्यापैकी दोन सुवर्ण…महिला एकेरीतील अंतिम फेरीत तिनं सिंगापूरच्या यू मेंग्यूचं आव्हान मोडीत काढलं. त्यासरशी राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू बनली…
अंतिम फेरीत सिंगापूरला हरवून भारतीय महिला संघाला सुवर्णाची कमाई करून देण्यातही तिनं मोलाचा वाटा उचलला. सिंगापूरचा महिला टेबल टेनिस चमू 2002 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत अपराजित राहिला होता हे लक्षात घेता हा पराक्रम आणखीनच प्रभावी ठरतो
2018 च्या आशियाई खेळांमध्ये मनिका बात्रानं शरथ कमलसह मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं…शिवाय त्याच वर्षी तिला प्राप्त झाला तो आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचा ‘ब्रेकथ्रू स्टार’ पुरस्कार. हा पुरस्कार मिळालेली ती एकमेव भारतीय टेबल टेनिसपटू…

अन्य पराक्रम…

मनिका बात्रानं सुरुवात केली ती 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेतून. तिनं तीन सुवर्णपदकांची कमाई केली आणि त्या वर्षीच्या रिओ खेळांतून ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं…
दिल्लीत जन्मलेली अन् टेबल टेनिसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तरुणपणी मॉडेलिंगच्या ऑफर्स नाकारलेली बात्रा तिचा आदर्श अचंता शरथ कमलप्रमाणंच पहिल्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली तेव्हा 21 वर्षांची होती. रिओमध्ये ती पहिल्याच फेरीत बाद झाली असली, तरी बरंच काही शिकायला मिळालं…
2017 साली मनिका जागतिक क्रमवारीत 104 व्या स्थानावर पोहोचून भारतातील सर्वोच्च क्रमांकाची महिला टेबल टेनिसपटू बनली. शिवाय जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय जोडी ठरून बात्रा आणि मौमा दास यांनी इतिहास रचला…

टोकियो ऑलिम्पिक व नंतर…

टोकियोतील खेळांमध्ये ऑलिम्पिकच्या एकेरी गटातील 32 खेळाडूंच्या फेरीत पोहोचणारी पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरून मनिका बात्रानं पुन्हा इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळविलं…
टोकियोनंतर मनिकानं पुन्हा इतिहास रचला तो साथियान ज्ञानशेखरनसोबत ‘वर्ल्ड टेबल टेनिस’ स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू बनून. 2021 साली त्यांनी खात्यात जमा केलं ते ‘वर्ल्ड टेबल टेनिस कंटेन्डर बुडापेस्ट’चं मिश्र दुहेरीचं विजेतेपद..
2022 मध्ये तिनं साथियानसमवेतच दोहातील ‘वर्ल्ड टेबल टेनिस कंटेन्डर’ स्पर्धेत मिश्र दुहेरीचं रौप्य, तर दोहा येथील ‘वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेन्डर’ स्पर्धेत अर्चना कामतसह महिला दुहेरीतील कांस्यपदक पटकावून दाखविलं…
मनिका 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आणि 2023 च्या आशियाई खेळांमध्ये पदक मिळवण्यात अयशस्वी ठरली, परंतु गेल्या काही वर्षांत तिनं महिला एकेरीतील आघाडीच्या 100 खेळाडूंमधील स्थान सातत्यानं राखलं…

खेळ जुनाच ओळख नवी ! फिगर स्केटिंग
फिगर स्केटिंग…असा खेळ ज्यामध्ये एकेरी खेळाडू किंवा खेळाडूंचे संघ बर्फावर कलात्मक कामगिरी करतात. पुऊष आणि महिला आपापल्या एकेरी गटात सहभागी होतात, तर ‘पेअर स्केटिंग इव्हेंट’ आणि ‘आईस डान्सिंग’ प्रकारात झळकते ती जोडी. हे दोन्ही विभाग पुरुष तसेच महिलांसाठी खुले असतात अन् त्यात सर्वसाधारणपणे एक पुऊष व एक महिला अशी जोडी उतरताना दिसते…

फिगर स्केटिंगमध्ये खेळाडूंचं उद्दिष्ट शक्य तितके जास्त गुण मिळवणं हा असतो. प्रकाराच्या स्वरुपानुसार गुण मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत…
फिगर स्केटिंगमध्ये पंच मंडळाला प्रभावित करण्यासाठी खेळाडू विविध प्रकारच्या चाली तयार करतात. या चालींमध्ये हवेत गिरकी घेत उडी नि ‘स्पायरल’ (यात ‘स्केटर’ एका पायावर सरकतो आणि दुसरा पाय कंबरेच्या पातळीपेक्षा वर उचलतो), बर्फावरील गिरक्या अन् अनेक वेगवेगळ्या ‘स्टेप्स’चा समावेश असतो…
जोडीनं स्केटिंग करण्याच्या प्रकारात खेळाडू जास्त गुण मिळविण्यासाठी विविध चाली करतात जशा की, सहकाऱ्याला हवेत फेकणं, वेगवेगळ्या दिशेनं फिरविणं…‘आईस डान्सिंग’ हे काहीसं ‘पेअर स्केटिंग’सारखंच असतं. मात्र येथे भर राहतो तो पदन्यास आणि समन्वयावर. कारण त्यात सहभागी खेळाडू संगीतावर निर्धारित वेळेत नृत्य करतात…
या प्रकारात सहभागी खेळाडूंकडून खास ‘फिगर स्केट्स’ वापरले जातात….खेळाडूंना पंच मंडळाद्वारे (सामान्यत: तांत्रिक निरीक्षक आणि रेफ्रीसह त्यात समावेश असतो तो नऊ पंचांचा) विविध प्रकारच्या चालींसाठी वेगवेगळ्या प्रमाणात गुण दिले जातात. तसंच या चाली किती कार्यक्षमतेनं आणि प्रभावीपणे अमलात आणल्या जातात त्याचाही विचार केला जातो. त्यानंतर साऱ्या गुणांची बेरीज केली जाते…
फिगर स्केटिंगमध्ये गुण मिळविण्यासाठीच्या मुख्य पैलूंमध्ये कौशल्य, पदन्यास, कामगिरी, एकंदर अंमलबजावणी, कोरिओग्राफी, टायमिंग व नियंत्रण यांचा समावेश राहतो. अधिक जटील चाली योग्यरीत्या अमलात आणल्या गेल्यास त्यांना जास्त गुण मिळतात. उदाहरणार्थ, उडी मारल्यानंतर हवेत जितक्या जास्त गिरक्या तितके जास्त गुण…
फिगर स्केटिंगमधील खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीमध्ये विविधता ठेवली पाहिजे. नियमांनुसार, कोणताही सहभागी खेळाडू दोनपेक्षा जास्त वेळा ‘ट्रिपल’ किंवा ‘क्वाड्रपल’ उडी मारण्याचा प्रयत्न करू शकत नाही…
संगीत व पोशाखासंदर्भातील नियमांचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास त्याचा फटका बसू शकतो आणि पूर्णपणे अपात्रही ठरविलं जाऊ शकतं. विशिष्ट प्रकारच्या संगीताला त्यात परवानगी नसते. तसंच वेळेचं उल्लंघन झाल्यास खेळाडूंना अपात्र ठरविलं जाऊ शकतं…
फिगर स्केटिंग हा हिवाळी ऑलिम्पिकचा सुरुवातीपासून म्हणजे 1924 पासून भाग राहिलाय आणि त्यापूर्वी 1908 तसंच 1920 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये देखील हा प्रकार झळकला होता…
ऑलिम्पिक फिगर स्केटिंगमध्ये सध्या वर्चस्व गाजवतेय ती अमेरिका. त्यांच्याकडे आहेत एकूण 49 पदकं….रशिया व ऑस्ट्रिया अनुक्रमे 26 आणि 20 पदकांसह त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी आहेत. तत्कालीन सोव्हिएत युनियननंही त्यांच्या काळात 24 पदकं जिंकली होती…

– राजू प्रभू
अडथळ्यातील धाव…अन् विश्वविक्रमाचे कोंदण : नायजेरियन अॅथलिट टोबी अॅम्युसनची यशोगाथा
कर्तृत्व असेल तर परिस्थिती झुकते हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. मात्र संपूर्ण जग याचं पुन्हा साक्षीदार झालं आहे. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत ज्यांचा संघर्ष दोन वेळेच्या पोट भरण्यापुरता मर्यादित आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीवर मात करुन पुढं येणारे लोक जगाच्या इतिहासावर आपलं नाव कोरतात. ही कहाणी अशाच एका संघर्षमय महिलेची आहे. नायजेरियाच्या ‘टोबी अॅम्युसन‘ने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर हर्डल रेसमध्ये (अडथळ्यांची शर्यत) विश्वविक्रम प्रस्थापित करत इतिहास रचला. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती नायजेरियाची पहिली महिला अॅथलीट ठरली. असे अनेक कारनामे तिने केले आहेत, टोबीच्या या कारकिर्दीचा घेतलेला थोडक्यात आढावा…
ज्या देशात पोट भरण्यासाठीचा संघर्ष अजून आहे तिथं प्राधान्यक्रम नोकरी करणं, आयुष्यात स्थिरस्थावर होणं ही लांबची गोष्ट. प्रत्येक वडिलांप्रमाणं टोबी अॅम्युसनच्या वडिलांचीही इच्छा होती की आपल्या मुलीनं शिक्षण पूर्ण करावं. एक उच्चअधिकारी व्हावं. टोबी देखील अभ्यासू होती. शाळेत चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण व्हायची. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वयाच्या 15 व्या वर्षी असं काही घडलं की तिच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. शाळेतील एका स्पर्धेत टोबीने 100 मीटर रेसमध्ये भाग घेतला होता. त्यात ती पहिली आली. इथूनच खऱ्या अर्थाने टोबीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
नायजेरियातील इजेबु ओडे हे टोबीचे गाव. घरात वडिलांची कठोर शिस्त. त्याला जुमानून क्रीडा प्रकारांसारखं अस्थिर करिअर टोबीने निवडलं, हे तिच्या वडिलांना न पटण्यासारखं होतं. मात्र टोबी आणि तिच्या आईने वाद घालण्यापेक्षा युक्ती केली. पुस्तकांना जीवन समजणाऱ्या मुलीचे पाय जग मोजण्यासाठी अधीर होत होते. वडिलांनी केलेल्या कठोर नियमांविरुद्ध ती बंड करायला तयार होती. आईचीही साथ मिळाल्यावर तिची स्वप्नं भरारी घेऊ लागली. ती नियमित सरावासाठी मैदानावर जाऊ लागली. जेव्हा जेव्हा तिच्या वडिलांनी टोबी कुठे आहे असे विचारलं? तेव्हा तिची आई म्हणायची, टोबी चर्चला गेली आहे. याची फलप्राप्ती म्हणजे सध्याच्या घडीला जगातील सर्वात वेगवान हर्डल रेसर म्हणून टोबीनं ख्याती कमावली आहे.
तेलाच्या खाणीत सापडलेला हिरा
नायजेरिया हा देश प्रामुख्याने तेलाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पण या देशाला एक अनोखे वरदानही लाभले आहे असे म्हणता येईल. जागतिक क्रीडा क्षेत्रात दिग्गज असे अनेक अॅथलिट नायजेरियाने दिले आहेत. अॅथलेटिक्समधील प्रत्येक खेळात नायजेरियन खेळाडूंचे वर्चस्व दिसून येते. यातच गेल्या काही काळापासून महिला अॅथलिट टोबी अॅम्युसनने आपल्या वेगानं नायजेरियाला नवी ओळख दिली आहे. 23 एप्रिल 1997 मध्ये नायजेरीयाच्या इजेबू ओडे येथे जन्मलेल्या टोबीनं 2013 च्या आफ्रिकन युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलं. कोणत्याही मोठ्या स्पर्धेतील हे पहिलं पदक होतं. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती जगातील सर्व मोठ्या स्पर्धा जिंकते आहे.
एकाच वर्षात तीन वेळा विक्रमी कामगिरी
अडथळ्यांची शर्यत म्हटले की वेग आलाच. याच वेगाला गवसणी घालत टोबीने 2022 या एकाच वर्षात तीन वेळा विक्रमी कामगिरी केली. 2022 मधील जून महिन्यात झालेल्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत 100 मी अडथळ्यांच्या शर्यतीत 12.41 सेकंद अशी वेळ नोंदवली. यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर 23 जुलै रोजी युजीन वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 12.40 सेकंद ही वेळ नोंदवली. यानंतर एकाच दिवसात म्हणजेच 24 जुलै रोजी याच स्पर्धेत 12.12 सेकंद वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड केले. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मी अडथळ्यांच्या शर्यतीत वर्ल्ड रेकॉर्ड करणारी ती नायजेरियाची पहिली महिली अॅथलिट ठरली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप असो, राष्ट्रकुल स्पर्धा किंवा डायमंड लीग, आफ्रिकन अॅथलेटिक्स गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टोबीने यशाला गवसणी घातली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला 60 मी. हर्डल्समध्ये तिने 7.75 सेकंद वेळ नोंदवत नवे आफ्रिकन रेकॉर्ड केले. याशिवाय, मागील आठवड्यात जमैकात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत या वर्षातील (12.40 सेकंद) सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत तिने जमैकाची विद्यमान विश्वविजेती डॅनियल विल्यम व अमेरिकेची दिग्गज खेळाडू क्रिस्टिना क्लेमेन्स यांना मागे टाकले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी अवघे काही दिवस राहिले असताना टोबीने ही धमाकेदार कामगिरी साकारली आहे. टोबी ऑलिम्पिकमध्ये 100 मी. हर्डल्स व 4  बाय 100 मी. रिलेत सहभागी होणार आहे. या वर्षी दमदार फॉर्ममध्ये असलेल्या टोबीला पॅरिस ऑलिम्पिकचे सुवर्ण खुणावते आहे.
– विनायक भोसले