पन्नू प्रकरणात भारताचे सुरक्षा हित सामील

पन्नू प्रकरणात भारताचे सुरक्षा हित सामील

विदेशमंत्र्यांकडून अमेरिकेच्या राजदूतांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी वक्तव्य केले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात एका शासकीय अधिकाऱ्याच्या कथित सहभागाच्या चौकशीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा हित जोडले गेलेले असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्या वक्तव्यावसंबंधी बोलताना जयशंकर यांनी आम्ही याप्रकरणी चौकशी करत असल्याचे म्हटले आहे. या चौकशीत आमचे स्वत:चे राष्ट्रीय हित सामील असल्याचे आमचे मानणे आहे. अमेरिकेच्या सरकारला जे वाटते तसेच अमेरिकेचे राजदूत म्हणतील असे जयशंकर यांनी नमूद केले आहे.
कुठल्याही दुसऱ्या देशाच्या नागरिकाच्या हत्येच्या प्रयत्नात एक शासकीय अधिकारी सहभागी असणे अस्वीकारार्ह आहे असे वक्तव्य एरिक गार्सेटी यांनी केले होते. याप्रकरणी आम्हाला काही माहिती पुरविण्यात आली असून त्यासंबंधी आम्ही चौकशी करत आहोत. यात भारताचे स्वत:चे सुरक्षा हित देखील जोडले गेलेले असल्याचे जयशंकर यांनी गार्सेटी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
चौकशीविषयी जेव्हा कधी आम्हाला काही सांगायचे असल्यास आम्ही निश्चित सांगणार आहोत. सध्या याप्रकरणी चौकशी केली जातेय एवढंच सांगू शकतो असे जयशंकर यांनी नमूद केले आहे.
भारतीयांची रशियात फसवणूक
भारतीयांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत रशियात नेण्यात आल्यावर युक्रेन युद्धात सामील केल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर जयशंकर यांनी रशिया सरकारसमोर अत्यंत मजबुतीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.