सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून

सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून

सूर्योदयाला अक्षतारोपणानंतर रथोत्सवाला प्रारंभ : सांबरावासीयांकडून जय्यत तयारी : गदगेच्या ठिकाणी प्रतिअक्षरधाम मंदिराची उभारणी
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे मंगळवार दि. 14 मे पासून सुरू होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी सांबरावासीय सज्ज झाले आहेत. तब्बल 18 वर्षांनंतर होत असलेल्या या यात्रेची यात्रोत्सव कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे सध्या गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. गावच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या ठिकाणी मंडप स्वरुपात भव्य अक्षरधाम मंदिर उभारण्यात आले आहे. मंगळवार दि. 14 मे रोजी सूर्योदयाला अक्षतारोपण होईल, त्यानंतर देवीचा भन्नाट (खेळ) करून देवी रथावर आरूढ झाल्यानंतर रथोत्सवास प्रारंभ होणार आहे.
यात्रा कमिटीची धडपड
यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी रात्रंदिवस धडपडत आहे. वेगवेगळ्या कमिट्या स्थापून व योग्य नियोजन करून यात्रेची तयारी करण्यात आली आहे
यात्रेचे खास आकर्षण 60 फुटी रथ
यात्रेमध्ये साठ फूट उंचीचा रथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. रथाचे काम उत्कृष्ट झाले असून रथावर विविध देवी-देवतांची चित्रे  साकारण्यात आली आहेत. सोमवारी सायंकाळी रथावर कळस चढविण्यात आला. गावातील कारागिरांनी गेले अनेक दिवस परिश्रम घेऊन रथाचे काम पूर्ण केले आहे. सध्या रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत असून मनमोहक दिसत आहे. शुक्रवार दि. 17 पर्यंत रथोत्सव सुरू राहणार आहे. यादरम्यान गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  गावामध्ये पाळणे आदी मनोरंजनाचे साहित्य उभारण्यात आले असून विविध स्टॉल्सही घालण्यात आले आहेत. पार्किंगचीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान मारीहाळ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. कमिटीच्यावतीने बाऊन्सर्स ही नेमण्यात आले आहेत. तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बस फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत.
पै-पाहुण्यांचे आगमन
यात्रेनिमित्त गावामध्ये पै-पाहुण्यांचे आगमन होऊ लागले आहे. मूळचे सांबरा गावचे असलेले व सध्या परगावी राहत असलेल्या लोकांचेही गावात आगमन झाले आहे. शेतवडीमध्ये मंडप उभारून यात्रेची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावात स्वच्छता मोहीम राबविली असून जिथे गरज आहे तिथे विविध विकासकामे करवून घेतली आहेत. यात्रेदरम्यान गावामध्ये कचरा उचलण्यासाठी कचरावाहू गाडी फिरणार आहे. तसेच पाण्याची टंचाई भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.