सरकारी कार्यालये-बँकांमध्ये सलग सुट्यांमुळे नागरिकांची गर्दी

सरकारी कार्यालये-बँकांमध्ये सलग सुट्यांमुळे नागरिकांची गर्दी

बेळगाव : बँका, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सलग सुट्यांनंतर सोमवारी नागरिकांची गर्दी झाली. सलग तीन दिवस सुटी असल्याने व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी सकाळी कार्यालये उघडल्यापासून नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत सोमवारी सायंकाळी उशिरापयर्तिं व्यवहार सुरळीत करावे लागले. शुक्रवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त बँकांसह सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली होती. सेकंड सॅटर्डेमुळे कार्यालयांना शनिवारी सुटी होती. तर रविवारी साप्ताहिक सुटी होती. सलग तीन दिवस सुटी असल्याने व्यवहार ठप्प होते. विशेषत: बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ज्या नागरिकांना ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग याची माहिती आहे, त्यांना तितकासा परिणाम जाणवला नसला तरी वयोवृद्ध व महिलांना फटका बसला. सुट्यांनंतर सोमवारी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. कर्ज काढणे, व्यावसायिक कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे, पासबुक अपडेट करणे, पैसे भरणे व काढणे यासाठी नागरिकांनी सकाळी 10 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. शहरातील महत्त्वाच्या बँकांमध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी जादा काऊंटर सुरू करून गर्दी आटोक्यात आणली. पासबुक अपडेट करताना सर्व्हरडाऊनची समस्या जाणवत होती.