समादेवी गल्लीतील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

समादेवी गल्लीतील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

रोजच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी
बेळगाव : समादेवी गल्ली, यंदे खूट, खडेबाजार या परिसरातील वाहतूक कोंडी नित्याचीच ठरत आहे. बेशिस्तपणे वाहनांचे करण्यात आलेले पाविर्ढिंग, त्यात वाहनचालकांचा मनमानीपणा यामुळे सोमवारी समादेवी गल्ली येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीवेळी दोन रहदारी पोलीस हजर होते. परंतु, वाहनांची संख्या पाहता ते देखील हतबल झाले. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. समादेवी गल्ली येथे रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते, फळविक्रेते बसलेले असतात. त्यातच जागा मिळेल तेथे दुचाकी व चारचाकी वाहनांचे पाविर्ढिंग केले जाते. या गल्लीमध्ये अनेक कार्यालये, बँका, आस्थापने असल्यामुळे ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे वाहन पाविर्ढिंग करायला जागाच नसल्याने ज्या ठिकाणी खुली जागा आहे, त्या ठिकाणी अथवा रस्त्याच्या शेजारी वाहनांचे पाविर्ढिंग करण्यात येत आहे.  सोमवारी दुपारी समादेवी गल्ली हनुमान मंदिर येथे वाहनांची कोंडी झाली होती. गोंधळी गल्ली येथून येणारी वाहने समादेवी गल्ली येथे कोंडीमध्ये अडकल्याने चारही बाजूंनी  रांगा लागल्या. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास वाहनचालकांना रस्त्यामध्येच उभे रहावे लागले. यंदे खूट येथे सेवा बजावत असलेले रहदारी पोलीस कोंडीच्या ठिकाणी दाखल झाले. परंतु, चारही बाजूंनी प्रचंड गर्दी झाल्याने वाहने नेमकी कोठून काढायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
समादेवी गल्लीत वारंवार वाहतूक कोंडी
बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवली. हे सोमवारपुरते मर्यादित नसून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याशेजारी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विक्रेत्यांना एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन समादेवी गल्लीचा रस्ता खुला ठेवण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.