वाराणसीत मोदींचा भव्य रोड शो

वाराणसीत मोदींचा भव्य रोड शो

काशी विश्वनाथ येथे विशेष पूजा : आज उमेदवारी अर्ज भरणार
वृत्तसंस्था/ वाराणसी
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी काशीमध्ये सहा किलोमीटर लांबीचा भव्य रोड शो केला. रोड शोनंतर पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ येथे विशेष पूजाही केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मंत्री आणि आमदारही या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असून त्यांच्या नामांकनात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री वाराणसीत पोहोचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून तेथे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज भरणार असून पक्षाकडून भव्य-दिव्य शक्तिप्रदर्शन होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये 5,000 हून अधिक ‘मातृशक्ती’ (महिला) सामील झाल्या होत्या. याप्रसंगी समर्थकांचा उत्साह दिसून येत होता. केवळ पाच ते सहा किलोमीटरच्या रोड शोसाठी अडीच तास इतका अवधी लागला तरी लोकांच्या उत्साहात काही कमी नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची उत्साही गर्दी जमली होती. अनेक तऊण समर्थक वंदे भारत टेनचे मॉडेल सहभागी झाले होते. मोदींचा रथ समोरून जात असताना पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले जात होते.
रोड शो संस्मरणीय बनवण्यासाठी संपूर्ण मार्ग हजारो किलो फुलांनी सजवण्यात आला होता. संपूर्ण मार्गावर फुलांची उधळण केली जात होती. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानींवरही फुलांची सजावट करण्यात आली होती. 20 हून अधिक ठिकाणी फुलांची वृष्टी करण्यासाठी फ्लॉवर मशीनही लावण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांना पाहण्यासाठी आणि त्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये क्लिक करण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती. घरांच्या उंच गच्चीवरही लोक जमले होते. अनेक घरांच्या बाल्कनीत लोक एकमेकांना आधार देत उभे असलेले दिसत होते.