घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 ठार

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 ठार

मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान, अन्य 54 जखमी, मदत कार्याला वेग
प्रतिनिधी/ मुंबई
राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने राजधानी मुंबईला जबरदस्त धडक दिली. वादळी वारे आणि तुफान पाऊस यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या. वादळी वाऱ्याने घाटकोपर येथील पेट्रोलपंपावर अजस्त्र होर्डिंग कोसळला. याखाली दबल्याने 8 जण ठार झाले तर 54 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिणामी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
120 फुटांचे महाकाय होर्डिंग
याठिकाणी ताशी 65 किमी वेगाने वारे वाहत होते. घाटकोपरमधील छेडानगरजवळील पेट्रोलपंप येथे मोठे होर्डिंग कोसळले. सुमारे 120 फूट लांबीचे हे होर्डिंग कोसळताच घटनास्थळी मोठाच गदारोळ उडून गेला. इंधन भरण्यासाठी आलेले, त्याचबरोबर पाऊस आणि वाऱ्यापासून बचावासाठी आलेले अनेक नागरिक या होर्डिंगखाली अडकून पडले. त्याखाली 100 जण अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह जवानांनी तिकडे धाव घेतली. प्रशासनातील विविध खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना मदत देण्यास तत्काळ सुरुवात केली.

पहिल्या टप्प्यात 35 जणांना वाचवले
दरम्यान, बचाव दलाने केलेल्या तत्काळ मदतीमुळे 35 जखमी नागरिकांना बाहेर काढून राजावाडी ऊग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ टिमला पाचारण केले. या ठिकाणी 20 पेक्षा अधिक ऊग्णवाहिकांना तैनात केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. बचाव कार्यास वेग देण्यात आला असला तरीही या ठिकाणी असलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या साठवण टाक्यांमुळे गॅस कटरचा वापर करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. केवळ मानवी शक्तीवरच होर्डिंग हटवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मदत कार्यास विलंब होत असल्याचेही सांगण्यात आले.
होर्डिंग बेकायदेशीर, नोटीस बजावल्याचा मनपाचा दावा
दरम्यान हे होर्डिंग बेकायदेशीर होते असे सांगत महानगरपालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याबाबतची नोटिस बजावली असल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी घटनास्थळी जमलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दिली. तर दुसऱ्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत वडाळ्याजवळ सीजी टॉवरजवळ काही जण दबल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत 8 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत 66 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य जारी असून घटनेच्या ठिकाणी अजून 25 ते 30 जण अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
त्याचबरोबर आगामी वादळवारे आणि पावसाळी हवामान पाहता अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्याबाबतच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठे होर्डिंग लावू नयेत यासाठी तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी सूचनाही प्रशासनाला दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून याच काळात 40 ते 50 ताशी किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा दिला आहे.
खराब हवामानाचा राजकीय सभांना फटका
मुंबई एमएमआर रिजनमध्ये सायंकाळी अचानक बदललेल्या खराब हवामानाचा फटका राजकीय नेत्यांना बसला. यात कल्याणमधील उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे उ•ाण रद्द करण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हॅलिकॅप्टरचे चाक हॅलिपॅडवरच खचले. सुर्दवाने दुर्घटना टळली असल्याची माहिती मिळत आहे.
वाहतूक विस्कळीत
धुळीचे वादळ असल्याने रस्ते वाहतूकीवर मोठा परिणाम झाल. वाऱ्याच्या वेगामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. यात बीकेसी, पूर्व द्रुतगती मार्ग तसेच आयआयटी पवई कॅम्पसचा समावेश आहे. तर मध्यरेल्वेची वाहतूक ओव्हर हेड खांब कोसळल्याने विस्कळीत झाली. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद  करण्यात आली होती. दरम्यान प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.