यंदा आयटी हार्डवेअर उत्पादनाला मिळणार चालना

माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या कंपन्यांकडून आयटी हार्डवेअरच्या उत्पादनाला यंदा सुरुवात होणार आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी दिली आहे. पर्सनल कॉम्प्युटरसह देशांतर्गत पातळीवर सर्व्हर निर्मितीचे कार्य लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेटवेब टेक्नॉलॉजीज यांच्या अत्याधुनिक कम्प्युटिंग सर्व्हर […]

यंदा आयटी हार्डवेअर उत्पादनाला मिळणार चालना

माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या कंपन्यांकडून आयटी हार्डवेअरच्या उत्पादनाला यंदा सुरुवात होणार आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी दिली आहे.
पर्सनल कॉम्प्युटरसह देशांतर्गत पातळीवर सर्व्हर निर्मितीचे कार्य लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेटवेब टेक्नॉलॉजीज यांच्या अत्याधुनिक कम्प्युटिंग सर्व्हर निर्मितीच्या कार्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिले असता एस. कृष्णन बोलत होते.
किती कंपन्यांचे अर्ज
27 कंपन्यांपैकी पीएलआय योजनेचा लाभ प्राप्त असलेल्या 17 कंपन्यांकडून यंदा उत्पादनाला सुरुवात होणार आहे. यापैकी सहा ते सात कंपन्यांनी मागच्या वर्षीच उत्पादनाला प्रारंभ केला होता. सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये आयटी हार्डवेअरकरिता पीएलआय योजना मंजूर केली असून या अंतर्गत एचपी, डेल, फॉक्सकॉन, लिनोवा, नेटवेब टेक्नॉलॉजी यांच्यासह 27 कंपन्यांचे अर्ज पीएलआय योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले होते.
कृत्रिम बुद्धिमता विकासासाठी 10 हजार कोटी
विविध देशांनी कृत्रिम बुद्धिमता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेवर भर दिला असून भारतही आता याबाबतीत अग्रेसर होण्यासाठी पुढाकार घेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी सरकारने 10 हजार 372 कोटी रुपयांची तरतूद केली असून यासंदर्भात देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.