लखनौ – दिल्लीमध्ये आज ‘प्लेऑफ’च्या दृष्टीने निकराची झुंज

लखनौ – दिल्लीमध्ये आज ‘प्लेऑफ’च्या दृष्टीने निकराची झुंज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलमध्ये आज मंगळवारी होणाऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार असून यावेळी लखनौचा कर्णधार के. एल राहुलवर लक्ष केंद्रीत होणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची धूसर संधी जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने आज लखनौकडून प्रयत्न केले जाणार असून त्यांच्या इतकीच दिल्लीला देखील विजयाची गरज आहे.
गेल्या बुधवारी सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभूत केल्यानंतर संघाचे मालक संजीव गोएंका यांनी सर्वांसमक्ष फटकारल्याने एलएसजी कर्णधार म्हणून राहुलच्या भवितव्याबद्दल अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. राहुल कर्णधारपद सोडू शकतो किंवा एलएसजीला सोडण्यापूर्वी उर्वरित दोन सामन्यांत तो आपले कर्तव्य पार पाडेल अशीही चर्चा चालू आहे. कोणत्याही परिस्थितीत राहुल बॅटने प्रत्युत्तर देऊन विजयाने समारोप करण्याची इच्छा बाळगून असेल.
राहुल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही आणि त्यामुळे त्याला भारताच्या टी-20 संघातील स्थानच गमावून बसावे लागलेले नाही, तर 12 गुणांसह ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे देखील 12 गुण झाले असून ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सला मागील सामन्यात आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.राहुलच्या व्यतिरिक्त क्विंटन डी कॉकच्या खराब फॉर्ममुळे एलएसजी पॉवरप्लेमध्ये संघर्ष करत आहे. त्यामुळे मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्यावर दबाव येऊन त्यांना फटकेबाजीचे स्वातंत्र्य मिळालेले नाही.
पूरन आणि आयुष बडोनी यांनी मागील सामन्यात संघाला सावरण्यात यश मिळवलेले असले, तरी हेड आणि अभिषेक शर्मा या सनरायझर्सच्या दमदार जोडीविऊद्ध त्यांचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मयंक यादवला त्यांना गमवावे लागले असून त्याची उणीव यश ठाकूर आणि नवीन-उल-हक भरून काढू शकलेले नाहीत. तसेच मोहसिन खानलाही दुखापत झाल्याने तो मागील सामना खेळू शकला नाही. कृणाल पंड्या आणि रवी बिश्नोई या फिरकी जोडीनेही अधिक प्रभावी कामगिरी करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला एका सामन्याच्या निलंबनानंतर कर्णधार रिषभ पंतचे पुनरागमन होणार असल्यामुळे गोष्टी जाग्यावर पडतील अशी आशा असेल. रविवारी रात्री आरसीबीविरुद्ध क्षेत्ररक्षणातील चुकांची किंमत पंतशिवाय खेळणाऱ्या दिल्लीला चुकवावी लागली. त्यांच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कने सात सामन्यांत 330 धावा केल्या असून अभिषेक पोरेल, पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनीही या मोसमात धावा जमविलेल्या आहेत. गोलंदाजीत कुलदीप यादव (15 बळी) व अक्षर पटेल (10) या फिरकी जोडीने 25 बळी घेतले असून वेगवान गोलंदाज खलील अहमद (16 बळी) आणि मुकेश कुमार (16) यांनीही त्यांना यश मिळवून दिलेले आहे.
संघ : लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमारन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौतम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीरसिंह चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी.
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, सुमित कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे, ललित यादव, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, रिचर्डसन, एन्रिक नॉर्टजे, यश धूल, मिचेल मार्श, रिकी भुई, रसिख दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.