उचगाव मैदानात महेंद्र गायकवाडची बाजी
उमेश चव्हाणचा प्रेक्षणीय विजयी : प्रणव उचगाव गदेचा मानकरी
एन. ओ. चौगुले -उमेश मजुकर /उचगाव
उचगाव हनुमान कुस्तीगीर संघाच्यावतीने रविवारी मरगाई देवी मंदिराच्या परिसरातील भव्य अशा तलावामध्ये खास कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत महाराष्ट्राच्या महेंद्र गायकवाडने हरियाणाच्या विशाल भोंडूचा 22 व्या मिनिटाला धक्काघिस्सा मारून चारीमुंड्या चीत करीत उपस्थितीत 15 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. पहिल्या क्रमांकाची प्रमुख कुस्ती सायंकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पराभूत केलेला महेंद्र गायकवाड व हरियाणा केसरी विशाल भोंडू ही कुस्ती बाळकृष्ण खाचो तेरसे आणि हनुमान कुस्तीगीर संघटनेचे प्रफुल चौगुले, नेहाल जाधव यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला महेंद्र गायकवाडने एकेरीपट काढून भोंडूला खाली घेतले. पण भोंडूने त्यातून सुटका करून घेतली. 12 व्या मिनिटाला विशाल भोंडूने पायाला चाट मारून महेंद्रला खाली घेतले. पण अनुभवी महेंद्रने त्यातून सुटका करून घेतली. 17 व्या मिनिटाला महेंद्रने दुहेरीपट काढून हप्ते भरण्याचा प्रयत्न केला. बलदंड शरीराच्या विशालने अनुभवाचा फायदा घेत रीतसर सुटका करून घेतली. 21 व्या मिनिटाला महेंद्रने एकेरीपट काढून विशालला खाली घेत कब्जा मिळविला. विशालने खालून डंकी मारून सुटण्याचा प्रयत्न करत असताना महेंद्र गायकवाडने 22 व्या मिनिटाला धक्काघिस्सा मारून विशाल भोंडूला चारीमुंड्या चीत करून सलग दुसऱ्या वर्षी उचगाव मैदानात विजेतेपद पटकावित उपस्थित कुस्तीशौकीनांची वाहव्वा मिळविली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती श्रीराम सेना हिंदुस्तानचे भरत पाटील, जयवंत बाळेकुंद्री, लक्ष्मण होनगेकर, धनंजय जाधव, बाळासाहेब देसाई, मोतीराम देसाई, सुधाकर करटे, मनोहर होनगेकर, सुनील देसाई, दिलीप देसाई, मधु बेळगावकर यांच्या हस्ते लावण्यात आली. सह्याद्री क्रीडा संकुलन पुणेचा हितेश कुमार व उमेश चव्हाण कोल्हापूर ही कुस्ती लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला हितेश कुमारने उमेशला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण उमेशने त्यातून सुटका करून घेतली. 7 व्या मिनिटाला उमेश चव्हाणने पायाला टाच मारून हितेशला खाली घेऊन एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी हितेशने त्यातून सुटका करून घेतली. 9 व्या मिनिटाला हितेशने एकेरीपट काढत उमेशवर ताबा मिळवित मानेवरती घुटना ठेवून घुटन्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. 10 व्या मिनिटाला उमेश खालून डंकी मारून हितेशवर कब्जा मिळवित कोंदएकचाक डावावर हितेशला चारीमुंड्या चीत करीत उपस्थित कुस्तीशौकीनांची मने जिंकली. उपकर्नाटक केसरी प्रकाश इंगळगी व राष्ट्रीय पदक विजेता विक्रम शिनोळा ही तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुहास जाधव, पवन देसाई, दीपक देसाई, सचिन तरळे, एल. डी. चौगुले, रामा कदम, युवराज मुतेकर, मनोहर कदम, गजानन नाईक, सुरेश चौगुले, उमाशंकर देसाई यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला प्रकाशने विक्रमला दुहेरीपट काढत खाली घेऊन मानेचा कस काढीत घुटना ठेवून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण चालाकीने विक्रमने सुटका करून घेतली. 7 व्या मिनिटाला विक्रमने खालून डंकी मारत प्रकाशवर ताबा मिळविला व प्रकाशला झोळी बांधून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकाशने त्यातून सुटका करून घेत पायाला एकलंगी भरून चीत करताना विक्रमला गंभीर दुखापत झाल्याने प्रकाश इंगळगीला विजयी घोषित करण्यात आले.
4 थ्या क्रमांकाच्या कुस्तीत संजय इंगळगीने किर्तीकुमार कार्वेचा कोंदएकचाक डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. 5 व्या क्रमांकाची कुस्ती प्रेम जाधव व बाळू सिंधी कुरबेट ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. 6 व्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळी व किरण जाधव कोल्हापूर या कुस्तीत पृथ्वीराज पाटीलने एकेरीपट काढून झोळी बांधून चीत करण्याचा प्रयत्न केला. किरण जाधवच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पृथ्वीराज पाटीलला विजयी घोषित करण्यात आले. 7 व्या क्रमांकाच्या कुस्तीत संतोष हारूगिरीने तात्या धुळे कोल्हापूर याला घुटना डावावरती पराभूत केले. 8 क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील व सौरव काकडे पुणे ही कुस्ती डाव प्रति डावाने झुंजली. पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत राहिली. 9 व्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश कंग्राळीने राम पवारचा घिस्सा डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे प्रवीण पवार पुणे, कार्तिक इंगळगी, शुभम तिऊरवाडी, साहिल कंग्राळी, महेश तिर्थकुंडे यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर विजय मिळविला. मानाच्या गदेच्या कुस्तीत प्रणव उचगाव व जोतिबा माळवी कोल्हापूर ही कुस्ती बाळकृष्ण तेरसे व मधुरा तेरसे यांनी खाचो तेरसे यांच्या स्मरणार्थ ठेवली होती. या कुस्तीत प्रणव उचगावने हप्ते डावावरती जोतिबा माळवीचा पराभव करून चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. आकर्षक कुस्तीत सुरज उचगावने सचिन मच्छेचा एकचाक डावावरती विजय मिळविला. दुसऱ्या कुस्तीत नितीन मुतगाने आकाश उचगावचा झोळी डावावरती पराभव केला. तर तिसऱ्या कुस्तीत मंथन सांबराने निलेश उचगावचा एकचाक डावावरती पराभव केला.
या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बेळगाव, खानापूर, चंदगड अशा तालुक्यातून आलेल्या हजारो कुस्तीशौकीनामुळे मैदान खचाखच भरले होते. सायंकाळी या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पैलवान व माजी ग्रामपंचायत सदस्य गणपतराव पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक हुक्केरीकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर हनुमान फोटोचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य बी एस होणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कुस्ती मैदानाचे उद्घाटन परशराम चौगुले, विष्णू जाधव, श्रीपती तरळे, गोपाळ पाटील, सातेरी कोवाडकर, शिवाजी पावशे, ज्योतिबा उंद्रे यांच्या हस्ते या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. या कुस्ती मैदानात सुधीर बिर्जे, हुंदरे, कृष्णा पाटील कंग्राळी, मालू येळ्ळूर, बबन येळ्ळूर, परशराम अवचारहट्टी, ए. जी. मंतुरर्गी, शिवाजी पाटील, प्रशांत पाटील कंग्राळी, नवीन मुतगे, लक्ष्मण बिर्जे, परशराम चौगुले, बाळू चौगुले, श्रीपती तरळे, गोपाळ पाटील, गणपत पावले, सातेरी कोवाडकर, शिवाजी पावशे, जोतिबा हुंदरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे व एन. ओ. चौगुले यांनी केले. तर कसबा सांगाव कोल्हापूरच्या कृष्णात धुले यांनी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकीनांना खिळवून ठेवले. हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी श्रीकांत चौगुले, सुशील देसाई, परशराम जाधव, श्रेयस देसाई, प्रमोद देसाई, पारितोष हुक्केरीकर, अक्षय अष्टेकर, संदीप तरळे, अमोल जाधव, सौरभ जाधव, दिनेश देसाई, बळवंत देसाई, दर्शन देसाई, संदीप जाधव, यशवंत तरळे, तुषार जाधव, तुषार देसाई, यशराज मण्णूरकर, अथर्व जाधव यांनी परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी उचगाव मैदानात महेंद्र गायकवाडची बाजी
उचगाव मैदानात महेंद्र गायकवाडची बाजी
उमेश चव्हाणचा प्रेक्षणीय विजयी : प्रणव उचगाव गदेचा मानकरी एन. ओ. चौगुले -उमेश मजुकर /उचगाव उचगाव हनुमान कुस्तीगीर संघाच्यावतीने रविवारी मरगाई देवी मंदिराच्या परिसरातील भव्य अशा तलावामध्ये खास कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत महाराष्ट्राच्या महेंद्र गायकवाडने हरियाणाच्या विशाल भोंडूचा 22 व्या मिनिटाला धक्काघिस्सा मारून चारीमुंड्या चीत करीत उपस्थितीत 15 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. पहिल्या क्रमांकाची […]