बसवण कुडची येथील श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर, श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

बसवण कुडची येथील श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर, श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असून सोमवारी आंबिल गाड्यांची मिरवणूक उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त शनिवार दि. 30 रोजी पहाटे ग्रामस्थ इंगळ्यांची लाकडे आणण्यासाठी काकतीच्या डोंगराकडे रवाना झाले होते. सायंकाळी डोंगरावरून बैलगाड्यातून लाकडे घेऊन ग्रामस्थ गावात परतले. यावेळी ठिकठिकाणी आरती ओवाळून बैलगाड्यांची पूजा करण्यात आली. सोमवार दि. 1 रोजी सकाळी मंदिरात रुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला. तर सायंकाळी पाचनंतर आंबिल गाड्यांची मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी आंबिल व घुगऱ्या वाटण्यात आल्या. त्यानंतर गाडे पळविण्यात आले. आंबिल गाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर रात्री दहा वाजता शाहीर गाणे आदी कार्यक्रम पार पडले.
आज मुख्य दिवस
मंगळवार दि. 2 रोजी मंदिरात सकाळी धार्मिक पूजा होईल. तर सायंकाळी पाच वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी या यात्रेसाठी पंचक्रोशीतील व परगावचे हजारो भाविक यात्रेला उपस्थित असतात. यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीने जय्यत तयारी केली आहे.