पाकला बांगड्या घालायला लावू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकला बांगड्या घालायला लावू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

हाजीपूर (बिहार), वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची भीती इंडिया आघाडीतील डरपोक नेत्यांना असेल. आम्ही पाकिस्तानला बांगड्या घालायला लावू, अशा आक्रमक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी सोमवारी विरोधकांवर हल्लाबोल केला.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानकडे अण्वस्त्र असल्याने त्यांना आदर देण्याबाबतची वक्तव्ये केली होती. अब्दुल्ला यांनी तर पाकने बांगड्या घातलेल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर बिहारमधील हाजीपूर येथील प्रचार सभेत मोदी यांनी इंडिया आघाडीवर तोफ डागली. ते म्हणाले, विरोधी इंडिया आघाडीतील नेत्यांना पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची भीती वाटते. पाकमधील अण्वस्त्रांची त्यांना दिवास्वप्ने पडत आहेत. विरोधक डरपोक असल्यामुळे ते अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करीत आहेत. आम्हाला पाकची भीती वाटत नाही.
भाजप आणि घटकपक्ष पाकला बांगड्या घालायला लावतील. सर्व बाजूंनी जर्जर झालेल्या पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत, तर आम्ही त्यांना घालायला लावू. पाकिस्तानकडे  पुरेसा धान्यसाठा नाही. वीज नाही. त्यांच्याकडे घालायला बांगड्यासुद्धा नाहीत, अशा शब्दांत मोदी यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांची खिल्ली उडविली. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून गरीब आणि वंचितांच्या उद्धाराचा कार्यक्रम राबविला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंगेरीलाल के हसीन सपने…
मोदी म्हणाले, इंडिया आघाडी डरपोक आहे. या आघाडीतील नेत्यांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखी सत्तेची स्वप्ने पडत आहेत. इंडिया आघाडीने पाच वर्षांत पाच पंतप्रधान करण्याचा फॉर्म्यला तयार केला आहे. त्यांना दरवर्षी नवीन पंतप्रधान नियुक्त करायचा आहे. देशाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे अस्थिर सरकार नको आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असल्याने विरोधकांना त्यांची जागी दाखवून द्या, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

Go to Source