संकुचित दृष्टीकोन सोडून द्यावा

जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले : चाबहार बंदरावरून दिला होता इशारा वृत्तसंस्था/ कोलकाता भारत आणि इराण यांच्यात काही दिवसांपूर्वी चाबहार बंदराच्या व्यवस्थापनावरून करार झाला आहे. या करारामुळे भारत आणि इराण तसेच अन्य काही देशांचा लाभ होणार आहे, परंतु या करारामुळे अनेक देशांचा जळफळाट देखील होत आहे. मागील अनेक वर्षांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण आहे. […]

संकुचित दृष्टीकोन सोडून द्यावा

जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले : चाबहार बंदरावरून दिला होता इशारा
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारत आणि इराण यांच्यात काही दिवसांपूर्वी चाबहार बंदराच्या व्यवस्थापनावरून करार झाला आहे. या करारामुळे भारत आणि इराण तसेच अन्य काही देशांचा लाभ होणार आहे, परंतु या करारामुळे अनेक देशांचा जळफळाट देखील होत आहे. मागील अनेक वर्षांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण आहे. इराणसोबत करार करणाऱ्या देशावर निर्बंध लादले जाणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. तर याप्रकरणी विदेशमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला चांगलेच सुनावले आहे.
चाबहार बंदरावर झालेल्या कराराप्रकरणी लोकांनी स्वत:चा संकुचित दृष्टीकोन सोडून द्यावा. चाबहार बंदरामुळे पूर्ण क्षेत्राला लाभ होणार असून याविषयी संकुचित दृष्टीकोन अवलंबिला जाऊ नये असे विदेशमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले आहे.
चाबहार बंदरासोबत आमचे दीर्घकालीन संबंध आहेत. परंतु आम्ही कधीच दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करू शकलो नव्हतो. याकरता विविध समस्या कारणीभूत होत्या. अखेरीस त्यावर मात करत आम्ही दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करण्यास सक्षम ठरलो आहोत. दीर्घकालीन करार आवश्यक आहे, कारण याच्याशिवाय आम्ही बंदर संचालनात सुधारणा करू शकत नाही. बंदर संचालनामुळे पूर्ण क्षेत्राला लाभ होणार असल्याचे आमचे मानणे आहे असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
भूतकाळात चाबहार बंदरासंबंधी अमेरिकेची भूमिका पाहण्याची गरज आहे. अमेरिकेने चाबहार बंदराची व्यापक प्रासंगिकता असल्याचे म्हणत कौतुक केले होते असे जयशंकर यांनी नमूद पेले आहे.
पाश्चिमात्य माध्यमांचे ज्ञान नको
जयशंकर यांनी भारतीय निवडणुकीच्या पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर टीका केली आहे. ज्या देशांना निवडणूक निकाल निश्चित करण्यासाठी न्यायालयात जावे लागते, असे देश आज आम्हाला निवडणूक कशी घ्यावी याचे ज्ञान देऊ पाहत असल्याची उपरोधिक टीका जयशंकर यांनी केली आहे. पाश्चिमात्य देशांना मागील 200 वर्षांपासून आपणच जग चालवतोय असे वाटतेय. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे काही खास लोकांनाच देशाची सत्ता सांभाळताना पाहू इच्छितात. याचमुळे त्यांच्याकडून काही खास लोकांचे समर्थन केले जाते. पाश्चिमात्य माध्यमांकडून भारतासंबंधी नकारात्मक गोष्टी फैलावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पीओकेत अत्याचार, जम्मू-काश्मीरमध्ये विकास
पीओकेत सध्या उलथापालथ घडत आहे. तेथे राहणारे लोक स्वत:च्या स्थितीची तुलना जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांशी करत असतील. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा विकास होत असताना पीओकेतील लोकांवर अत्याचार होत आहे. पीओकेतील लोक गुलामीत जगत असल्याचे जयशंकर म्हणाले.