अबकी बार फिर एक बार मोदी सरकार

अबकी बार फिर एक बार मोदी सरकार

निवडणुकीपेक्षाही चर्चा अधिक रंगतदार…
? लोकसभा निवडणूक तिच्या गतीने पुढे जात आहे. मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. एकंदर 380 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ 163 मतदारसंघांमधील मतदान व्हायचे आहे. तेही पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पूर्ण होईलच. मतदान प्रक्रियेनंतर मतगणनेची प्रतीक्षा करायची आहे. मतगणना 4 जूनला असून त्याच दिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
? पण, मतगणना सोडाच, पण मतदानही पूर्ण होण्याआधी कोण जिंकणार, या विषयावर अत्यंत ज्वलंत किंवा ‘हॉट’ अशा स्वरुपाच्या चर्चा विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, युट्यूब वाहिन्या आणि प्रसारमाध्यमांवर झडत आहेत. त्या पाहिल्या आणि ऐकल्या, की, ‘बाजारात तुरी आणि भट भटीणीला मारी’ या म्हणीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. या चर्चांमधील गांभीर्यच हरवल्याचे दिसते.
चर्चावीरांचेच ध्रूवीकरण…
? 2014, 2019 आणि आता 2024 या तीन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य विषय ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ हाच असून ते हवेत की नकोत, या एक मुद्द्यावर देशातील मतदार विभागला गेल्याचे सर्व राजकीय विश्लेषक मान्य करतात. त्याच धर्तीवर प्रसारमाध्यमांवरील चर्चावीरांचेही ध्रूवीकरण झाल्याचे दिसते.
? विविध माध्यमांचा या चर्चांच्या संदर्भातून आढावा घेतला असता, दोन परस्परविरोधी सूर ऐकू येतात. एक, पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅटट्रिक करणार. दोन, त्यांना तसे करता येणार नाही. याच गोंधळात ‘अब की बार, 400 पार,’ होणार की नाही, यावरही बराच काथ्याकूट माध्यमांवर चालताना दिसतो.
? अशा प्रकारे, माध्यमे आणि सोशल मिडियावरील चर्चावीरांचेच ध्रूवीकरण अतिशय धारदारपणे झाल्याचे आढळून येते. प्रत्यक्ष मतदारांचे ध्रूवीकरण झाले आहे किंवा नाही, आणि झाले असलेच तर कशा प्रकारे आणि कोणत्या आधारावर, हे मतगणना झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण चर्चेचे ध्रूवीकरण झालेले आहे.
मुद्द्यांचे विश्लेषण
? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मुद्दे पाहता एक बाब स्पष्टपणे जाणवते ती अशी की हेच मुद्दे 2019 च्या निवडणुकीतही आताइतक्याच चेवाने मांडण्यात येत होते. त्यावेळच्या युट्यूब चर्चा किंवा मते आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या चर्चा किंवा मते पुन्हा ऐकली असता असे दिसते की, यावेळी काही परिस्थितीजन्य फरक वगळता तेच आरोप आजही केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट नाही. बेरोजगारी आणि महागाई हेच मुद्दे आहेत, असे त्या निवडणुकीच्या वेळीही आत्ताइतकाच जोर लावून ठसविण्यात येत होते.
? पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घाबरलेले आणि भेदरलेले आहेत, असा निष्कर्ष त्यांच्या विरोधातील राजकीय पक्षांनी आणि विचारवंतांनी 2019 च्या निवडणुतही काढला होता. आजही त्याच लोकांकडून तीच भाषा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर निवडणुकाच होणार नाहीत, हा आरोपही त्यावेळी होताच. पण असे आरोप होत असतानाही मागची निवडणूक भारतीय जनता पक्षाने अधिक मते आणि अधिक जागा मिळवून जिंकली. आता तेच आरोप त्याच व्यक्तींकडून केले जात असल्याने लोकांनी विश्वास कशावर ठेवायचा ?
? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांमध्ये ‘400 पार’ हा मुद्दा टीकेचा विषय ठरला आहे. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 जागा मिळवायच्या असतील तर दक्षिणेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये मोठे यश मिळवणे आवश्यक आहे. तशी स्थिती दिसत नाही, असे अनेकांचे मत आहे. शिवाय सध्या असलेल्या जागा टिकवून धराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे प्रस्थापित विरोधी भावना हा मुद्दा कोणत्याही 10 वर्षे सलग सत्तेवर राहिलेल्या सरकारसाठी कळीचा असतो. त्यावर कशी मात केली जाते, यावरच त्या पक्षाचे सलग तिसऱ्या मोठ्या निवडणुकीतील यश अवलंबून असते.