हलशी-नागरगाळी येथील रस्त्याचे काम रखडले

हलशी-नागरगाळी येथील रस्त्याचे काम रखडले

प्रवाशांसाठी रस्ता बनला धोकादायक : काम अर्धवट टाकून कंत्राटदाराचे पलायन : अधिकाऱ्यांचेही साफ दुर्लंक्ष झाल्याने संताप
खानापूर : हलशी-नागरगाळी रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू होते. कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या वाढीसाठी दोन्ही बाजूने चरी खोदल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली असून हलशी परिसरातील काही गावातील लोक या कंत्राटदाराविरोधात पोलिसात फिर्याद नोंदवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याची दुरुस्ती तसेच रुंदीकरणासाठी 5 कोटीचा निधी मंजूर झाला होता. सदर रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. याची दखल घेऊन अंजली निंबाळकर यांनी रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून 5 कोटीचा निधी मंजूर करून आणला. रस्त्याच्या निविदा ऑनलाईन मंजूर होऊन विजापूर येथील जयदेव बिराजदार या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम घेतले होते. हलशीपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. हलशीच्या पुढे हत्तरवाड ते हलगा या रस्त्यावर रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूला एकेक फुटाच्या चरी मारण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. कंत्राटदाराने दोन्ही बाजूला चरी मारुन काम अर्धवट सोडून पलायन केल्याने हे काम गेल्या दोन महिन्यापासून अर्धवट राहिले आहे.
निदान दोन्ही बाजूच्या चरी तरी बुजवा
रस्ता अगोदरच लहान,त्यातच दोन्ही बाजूने चरी मारल्याने या रस्त्यावरुन चारचाकी अथवा दुचाकी चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अनेकवेळा या रस्त्यावरुन वाहने बाजूला जावून अपघात घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे. निदान या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या चरी बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या चरीत पाणी भरल्यानंतर या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अंदाज येणार नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी तातडीने रस्त्याच्या चरी बुजवणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कंत्राट घेण्यात येते. या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, कंत्राटदार जयदेव बिराजदार याने काम हाती घेतले हेते. मात्र अर्धवट काम टाकून कंत्राटदाराने पलायन केले आहे. याबाबत कंत्राटदाराशी वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कामासंदर्भात आणि कंत्राट रद्द करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली आहे. याबाबत येत्या काही  दिवसात क्रम घेण्यात येईल व रस्त्याच्या चरी बुजवण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
गावकरीच कंत्राटदारांविरोधात फिर्याद देणार
या भागातील हलशी, हलगा, मेरडा, करजगी, इंदिरानगर, हत्तरवाड यासह अन्य गावे आहेत. या गावच्या नागरिकांशी संपर्क साधला असता, हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कंत्राटदाराने काम अर्धवट टाकून गेल्याने अधिकारीही हातवर करत आहेत. यासाठी आम्हीच या भागातील गावकरी कंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याच्या तयारीत आहोत, असे सांगण्यात येत आहे.