पशुसंगोपनतर्फे घटसर्प प्रतिबंधक लसीकरण

पशुसंगोपनतर्फे घटसर्प प्रतिबंधक लसीकरण

रोगापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी : पावसाळ्यापूर्वी मोहीम राबविणार
बेळगाव : पावसाच्या तोंडावर जनावरांना विविध साथीच्या रोगांची लागण होऊ नये यासाठी घटसर्प प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. विशेषत: जिल्ह्यातील पूर निर्माण होणाऱ्या ठिकाणी ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. हा विषाणूजन्य रोग असल्याने तातडीने फैलाव होतो. यासाठी खात्यामार्फत खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वीच जनावरांना लस टोचली जाणार आहे. दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात घटसर्प प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे या मोहिमेला उशीर झाला. विशेषत: दुधाळ म्हशींमध्ये हा रोग अधिक आढळतो. त्यामुळे म्हशींचे लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. पावसाच्या तोंडावर जनावरांना हिरव्या चाऱ्यातून विविध आजारांची लागण होते. संभाव्य साथीच्या रोगाची लागण टाळण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
खबरदारी म्हणून लसीकरण
जिल्ह्यात कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, मार्कंडेय नदीकाठावर पूर परिस्थिती निर्माण होते. परिणामी विविध रोगांचा धोका निर्माण होतो. यासाठी नदीकाठावरील गावांमध्ये प्रथमत: घटसर्प प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. लम्पीमुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याकडून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात 13 लाख जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, बैल या जनावरांना ही लस टोचली जाणार आहे. या रोगाची लागण झाल्यास दूध क्षमता कमी होऊन पशुपालकांना फटका बसतो. रोगाची तीव्रता अधिक असल्यास जनावर दगावण्याची शक्यता अधिक असते. यासाठी खबरदारी म्हणून खात्याकडून प्रतिबंधक मोहीम हाती घेतली जाणार आहे.