बळ्ळारी नाल्याच्या यंदाही शापच…!

पहिल्याच पावसात शिवार जलमय झाल्याने दुबार पेरणीचे संकट : प्रशासनाने खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता बेळगाव : मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. विशेषत: विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्याने पुराची भीती निर्माण झाली आहे. लेंडी आणि बळ्ळारी नाला यंदादेखील शेतकऱ्यांसाठी शाप ठरणार आहे. पावसाचा जोर वाढल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. दरवर्षी अनगोळ, शहापूर, येळ्ळूर, […]

बळ्ळारी नाल्याच्या यंदाही शापच…!

पहिल्याच पावसात शिवार जलमय झाल्याने दुबार पेरणीचे संकट : प्रशासनाने खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. विशेषत: विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्याने पुराची भीती निर्माण झाली आहे. लेंडी आणि बळ्ळारी नाला यंदादेखील शेतकऱ्यांसाठी शाप ठरणार आहे. पावसाचा जोर वाढल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. दरवर्षी अनगोळ, शहापूर, येळ्ळूर, जुने बेळगाव आदी शिवारातील पिकांना बळ्ळारीचा धोका पोहचू लागला आहे. मात्र यंदा पहिल्याच पावसात शिवार जलमय झाले आहे. विशेषत: लेंडी नाल्याचे पाणी शिवारात पसरले आहे. त्यामुळे यंदादेखील बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार आहे. सद्यस्थितीत बळ्ळारी नाला काठोकाठ भरून वाहू लागला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा कायम राहिल्यास बळ्ळारी नाल्यातील पाणी शिवारात पसरणार आहे.त्यामुळे बळ्ळारीचा धोका यंदा पहिल्या पावसातच पोहोचणार आहे.
बळ्ळारी नाल्याचे तोंड खुले करा
येळ्ळूर रस्त्याशेजारी बळ्ळारी नाल्याच्या तोंडावर माती टाकली आहे. त्यामुळे पाणी साचून राहिल्यास शेजारील शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत अनगोळ परिसरातील शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या तोंडासमोर टाकलेली माती काढून टाकावी आणि नाला खुला करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
लेंडी नाल्याचे पाणी शिवारात
शहरातून प्रवाहित झालेल्या नाल्याचे पाणी लेंडी नाल्यातून पुढे जाते. शनिवारी पहिल्याच पावसात लेंडीनाला भरून पाणी शिवारात पसरले आहे. त्यामुळे परिसरातील शेती जलमय झाली आहे. लेंडी नाल्याची रुंदी कमी झाल्याने दरवर्षी समर्थनगर परिसरातील रहिवाशांनाही याचा फटका बसू लागला आहे. नाल्याचे पाणी नागरी वस्तीत शिरू लागले आहे. मोठ्या पावसात काही घरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यंदा पहिल्याच पावसात लेंडीनाला बाहेर पडल्याने भीती व्यक्त होत आहे.
2019 ची पुनरावृत्ती होऊ नये
बळ्ळारी नाल्याशेजारील शेकडो एकर शेती दरवर्षी पाण्याखाली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यंदा हवामान खात्याने मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शिवाय मान्सून पहिल्याच दिवसापासून सक्रिय झाला आहे. त्यामुळे 2019 ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. 2019 मध्ये महापूर येऊन फटका बसला होता. हे टाळण्यासाठी वेळीच प्रशासनाने उपाययोजना राबवावी.