अरुणाचल, सिक्कीममध्ये पुन्हा सत्ताधाऱ्यांकडेच सत्ता

अरुणाचल, सिक्कीममध्ये पुन्हा सत्ताधाऱ्यांकडेच सत्ता

विधानसभा निवडणुकांची मतमोजणी : अरुणाचलमध्ये 46 जागांसह भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसला 1 जागा
वृत्तसंस्था/ इटानगर, गंगटोक
अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवत सत्तेत जोरदार पुनरागमन केले आह. एकूण 60 विधानसभा जागांपैकी 46 जागांवर भाजपने विजय संपादन केला. रविवारी विधानसभेच्या 60 पैकी केवळ 50 जागांचे निकाल जाहीर झाले. सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच दहा जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. अऊणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. दुसरीकडे, सिक्कीममध्येही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी रविवारी पूर्ण झाली असून तेथे ‘एसकेएम’ म्हणजेच सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 32 पैकी 31 जागांवर विजय मिळवला. विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रन्टला केवळ 1 जागा मिळाली.  या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आणि एसकेएमचे अभिनंदन केले आहे.
 
अरुणाचल प्रदेशमधील मतमोजणीदरम्यान रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कल स्पष्ट होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इटानगर येथील भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडले. रविवारी बोरदुरिया-बोगापानी जागा भाजपच्या वांगलिंग लोआंगडोंग यांनी जिंकली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) जोवांग होसाई यांचा 1,452 मतांच्या फरकाने पराभव केला.
लोवांगडोंगने 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार हमजोंग तांघा यांनी चांगलांग दक्षिण जागेवर नॅशनल पीपल्स पार्टीच्या टिंपू न्गेमूचा 1,482 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला.
अरुणाचल प्रदेशातील 50 विधानसभा जागांसाठी रविवारी सकाळी 6 वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. 60 सदस्यीय विधानसभेत भाजपने यापूर्वीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी एकाच वेळी मतदान झाले होते.
सिक्कीममध्येही पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच संधी
सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला (एसकेएम) बहुमत मिळाले आहे. 32 सदस्यीय विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी किमान 17 जागांची आवश्यकता असते.  मात्र, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 31 जागा जिंकून सर्वात मोठा विजय मिळवत हिमालयीन राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. दुसरीकडे, 2019 पर्यंत सलग 25 वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) केवळ एक जागा मिळवता आली.
सिक्कीममध्ये एसकेएमचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाला 58.38 टक्के मते मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एसकेएमने 17 जागा जिंकल्या होत्या. भाजपने येथे 31 जागांवर निवडणूक लढवली पण त्यापैकी एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाला एकूण मतदानापैकी 5.18 टक्के मते मिळाली. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या